Kurkumbh Drugs Case : सोळा फोटो अन् केम! | पुढारी

Kurkumbh Drugs Case : सोळा फोटो अन् केम!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हैदर शेख याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना गाड्यांचे नंबर, इलेक्ट्रिक मीटर, ड्रग्ज ओढण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, काही ठिकाणे असे तब्बल 16 फोटो मिळून आले. त्याच वेळी पोलिसांना या ड्रग्ज रॅकेटचा आवाका मोठा असल्याची कल्पना आली. तेथूनच पोलिसांनी ऑपरेशन अर्थ केम ही विशेष मोहीम हाती घेतली. तब्बल 16 पथके तयार करण्यात आली, तर तेवढेच मनुष्यबळ रिझर्व्ह ठेवण्यात आले. याच मोहिमेद्वारे पोलिसांनी विश्रांतवाडी, दिल्ली, मुंबई, सांगली, बिहार, पंजाब, सोलापूर, नगर या ठिकाणी छापे टाकले. या ऑपरेशनमध्ये त्या सोळा फोटोंनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दिसून येते.

… म्हणून रॅकेट उद्ध्वस्त झाले

पुणे पोलिसांनी तत्परता दाखवत लिंक मिळाल्यानंतर तत्काळ आपला मोर्चा कुरकुंभ आणि दिल्लीकडे वळविला. कुरकुंभ एमआयडीसीतून माल रेडी टू गो अवस्थेत होता. तसेच, दिल्लीतूनही ड्रग्जचा माल पुढे जाणार होता. येथे पोलिसांना दोन तासाचा तरी उशीर झाला असता तरी हे ड्रग्जचे रॅकेट पोलिसांच्या हाती लागू शकले नसते, अशी माहिती सूत्रांनी दिली. सोमवार पेठेत गुन्हे शाखा पथकाने सराईत गुन्हेगार वैभव माने याला मेफेड्रॉनची डिलिव्हरी देण्यासाठी निघाला असताना पकडले. त्याच्या तपासात विश्रांतवाडीतील हैदरची माहिती पुढे आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्यावेळी मिठाच्या गोदामातून तो एमडीची तस्करी करत असल्याचे पुढे आले. पोलिसांना वाटले कारवाई संपली आहे, मात्र जेव्हा हैदरच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले तेव्हा महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. तेथूनच हैदरच्या मिठाच्या गोडाऊनचा पोलिसांना शोध लागला. तेथे पोलसांना 55 किलो मेफेड्रॉन मिळाले. ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे कुरकुंभ एमआयडीत असल्याचे समोर आले. टेम्पोचालक आणि हमालांनी पोलिसांना माल कोठून कोठे आणि कसा गेला याची माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी मुंबई, दिल्ली गाठली. याचवेळी पोलिसांना मकानदार याची सांगलीतील माहिती मिळाली. तेथून पोलिसांना मोठा एमडीचा साठा जप्त केला. संदीप धुनिया याने ड्रग्ज निर्मिती, वाहतूक आणि विक्री या मध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पुढे आले. याचवेळी पोलिसांना दिल्लीतील एमडी साठवून ठेवलेल्या ठिकाणांची माहिती मिळाली. तेथून पोलिसांनी दिल्ली, पंजाब, बिहार, सोलापूर, नगरमध्ये पथके तैनात केली. स्वतः अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखेचे उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त यांनी ऑपरेशनची कमान सांभाळली. तीन दिवस दिवस रात्र मेहनत करून हे ऑपरेशन यशस्वी करून दाखविले.

हेही वाचा

Back to top button