Blessing : नवजात बालकावर दुर्मीळ डिव्हाइस क्लोजर प्रक्रिया यशस्वी

Blessing : नवजात बालकावर दुर्मीळ डिव्हाइस क्लोजर प्रक्रिया यशस्वी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुदतपूर्व जन्मलेल्या बाळावर खासगी दवाखान्यातील डॉक्टरांच्या टीमने हृदयाची गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडली. पिकोलो डिव्हाइस क्लोजर प्रक्रिया पुण्यात पहिल्यांदाच पार पडली आहे. 23 आठवड्यांचे मुदतपूर्व जन्मलेले बाळ वाचणे हे दुर्मीळ यश असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. इंटरव्हेंशनल पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. पंकज सुगावकर आणि वरिष्ठ नवजाततज्ज्ञ डॉ. तुषार पारीख यांच्या नेतृत्वाखाली लहान बाळावर उपचार करण्यात आले. कॅथलॅबमध्ये एक तास चाललेल्या प्रक्रियेत नवजात तज्ज्ञ, तंत्रज्ञ व परिचारिका यांचा समावेश होता.

डॉ. तुषार पारीख म्हणाले की, बाळाची प्रकृती जन्मल्यानंतर गंभीर होती. बाळाच्या काही चाचण्या करण्यात आल्या. बाळाला पेटंट डक्टस आर्टिरिऑसस (पीडीए) असल्याचे निष्पन्न झाले. बाळ दीड महिना व्हेंटिलेटरवर होते. पालकांचे समुपदेशन केल्यावर पिकोलो डिव्हाइस प्रक्रिया करायचा निर्णय घेतला. प्रक्रियेनंतर बाळाचे वजन 586 ग्रॅमपासून 1600 ग्रॅमपर्यंत वाढले होते.

पीडीए म्हणजे काय?

पीडीए हा जन्मजात हृदयविकार असून, यामध्ये 2 प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये एक छिद्र असते. सहसा हे छिद्र जन्मानंतर लवकर बंद होते. ते उघडे राहिले तर त्या स्थितीला पेटंट डक्टस आर्टिरिऑसस असे म्हणतात. छिद्र मोठे असल्यास व उपचार न केल्यास गुंतागुंत निर्माण होते.

पिकोलो डिव्हाइस हे उपकरण तीन चकत्यांच्या आकाराचे असून, एकावर एक थरांच्या स्वरूपात असते. मांडीमधून एका लहान छेदाद्वारे रक्तवाहिन्यांच्या मार्गातून हृदयापर्यंत नेले जाते आणि छिद्र बंद केले जाते. 6 ते 9 महिन्यांत या उपकरणावर पेशींचा एक थर उगवतो आणि हृदयाचा एक भाग बनतो. नंतर उपकरण बदलण्याची गरज नाही. त्याचबरोबर कुठल्या औषधांची गरज नाही. कमीत कमी छेद, संसर्गाचा कमी धोका आणि लवकर बरे होणे, अशा फायद्यांमुळे गंभीर परिस्थितीत ही प्रक्रिया सुयोग्य ठरते.

– डॉ. पंकज सुगावकर

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news