पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात डायलिसिस सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात सुविधा उपलब्ध होण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागात असलेले कमला नेहरू रुग्णालय हे महापालिकेचे सर्वांत मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात शहरातील आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने एका संस्थेशी करार केला होता.
मात्र, ही सुविधा देताना मशीन बंद पडण्याच्या घटनांमुळे महापालिकेने संबंधित संस्थेसोबत केलेला करार रद्द केल्याने अनेक दिवसांपासून रुग्णालयातील मशीन बंद आहेत. रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने डायलिसिस सेंटरसाठी नव्याने निविदा काढली आहे. येत्या एक महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये डायलिसिस उपचार उपलब्ध करून दिले जातील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये डायलिसिस उपचारासंबंधीची निविदा काढण्यात आली आहे. यामध्ये रुग्णालयात सुरू करण्यात येणार्या डायलिसिस सेंटरची सर्व मशिन्स, फर्निचर व उपचाराचे साहित्य संबंधित कंपनीला आणावे लागणार आहे. येत्या एक महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. डायलिसिसची सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका.
हेही वाचा