Lok Sabha Election : कोल्हापुरातून लोकसभेसाठी शाहू महाराज निश्चित | पुढारी

Lok Sabha Election : कोल्हापुरातून लोकसभेसाठी शाहू महाराज निश्चित

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू महाराज यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. चर्चेत उमेदवारीविषयी निर्णय झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. (Lok Sabha Election)

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू महाराज यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी शिक्कामोर्तब केले आहे. स्वतः शाहू महाराज यांनी याबाबत अद्याप भूमिका जाहीर केली नसली तरी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी केलेल्या सविस्तर चर्चा या शाहू महाराज यांच्या उमेदवारीला बळकटी देणार्‍या आहेत.

यापूर्वी 1980 ते 1998 या काळात काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभा मतदार संघावर वर्चस्व राहिले आहे. 1999 ते 2004 या कालावधीत या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. 2009 साली अपक्ष उमेदवार म्हणून सदाशिवराव मंडलिक यांचा विजय झाला. त्यांनी विजयानंतर काँग्रेसला पाठिंबा दिला. 2014 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर धनंजय महाडिक विजयी झाले. तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर संजय मंडलिक निवडून आले. सध्या ते शिंदे गटात आहेत.

महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा कोणी लढवायची, याबाबत चर्चा होती. याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावे-प्रतिदावे केले आहेत. मात्र, शाहू महाराज उमेदवार असतील तर कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची याचा निर्णय त्यांनीच घ्यावा, अशी भूमिका आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे याचा निर्णय ते स्वतःच घेतील.

पवारांच्या कोल्हापुरातील सभेनंतरच शाहू महाराजांच्या उमेदवारीची चर्चा

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी कोल्हापुरात जाहीर सभा घेतली होती. त्याचे अध्यक्षस्थान शाहू महाराज यांनी भूषवले होते. तेव्हापासूनच त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

Back to top button