विज्ञान शाखेला तुफान प्रतिसाद | पुढारी

विज्ञान शाखेला तुफान प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : यंदा बारावीच्या परीक्षेसाठी विज्ञान शाखेचे 7 लाख 60 हजार 46, कला शाखेचे 3 लाख 81 हजार 982, वाणिज्य शाखेचे 3 लाख 29 हजार 905, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 37 हजार 226, आयटीआयसाठी 4 हजार 750 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे कला आणि वाणिज्य शाखेच्या एकूण विद्यार्थीसंख्येइतके विद्यार्थी एकट्या विज्ञान शाखेतून परीक्षा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा विज्ञान शाखा जोमात आणि कला, वाणिज्य शाखा कोमात अशी परिस्थिती झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, विज्ञान शाखेतून अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा शाखांसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखा उपयुक्त ठरते. त्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा साडेपाच हजारांनी वाढली आहे. त्याशिवायच पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षी परीक्षेसाठी खासगीरीत्या 34 हजार 1 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर यंदा 39 हजार 587 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

तसेच पुनर्परीक्षार्थीही चार हजारांनी वाढले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत खासगी, पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सोळा हजारांनी वाढली आहे. खासगीरीत्या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे अधोरेखित झाले आहे. वाढलेल्या विद्यार्थीसंख्येबाबत गोसावी म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुढील दोन वर्षांत नवीन अभ्यासक्रम लागू होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय परीक्षा पद्धतीमध्येही बदल होऊ शकतात. त्यामुळे जुन्या अभ्यासक्रमानुसारच उत्तीर्ण होता येण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत असू शकतात. खासगीरीत्या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यामागे हे एक कारण असू शकते.

मेअखेरीस निकालाची शक्यता

यंदा राज्य मंडळाने अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीच्या तुलनेत ऑनलाइन प्रणालीमुळे काम अधिक वेगाने होणार आहे. त्याचा परिणाम निकाल तयार करण्याच्या प्रक्रियेवरही होऊ शकतो. त्यामुळे मे अखेरपर्यंत बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button