लिंग गुणोत्तरात 669 ग्रामपंचायती ‘रेड झोन’मध्ये | पुढारी

लिंग गुणोत्तरात 669 ग्रामपंचायती ‘रेड झोन’मध्ये

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात मुलींची घटती संख्या चिंता वाढविणारी आहे. जिल्ह्यातील 669 ग्रामपंचायतींमध्ये मुले- मुली लिंग गुणोत्तर प्रमाण हे दर हजारी 933 पेक्षाही कमी आहे. परिणामी, या ग्रामपंचायती रेड झोनमध्ये गेल्या आहेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेंतर्गत जिल्हा परिषदेकडून नुकताच अहवाल जाहीर केला, त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत अंतर्गत गावामधील 0 ते 6 वर्षांमधील मुले व मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये दर हजारी मुलांच्या बरोबर मुलींचे प्रमाण 933 पेक्षा कमी असलेल्या रेड झोनमधील ग्रामपंचायतीमध्ये जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

दरम्यान, खेड तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींची संख्या आहे. खेडमधील 83 ग्रामपंचायती, तर त्यानंतर 70 ग्रामपंचायती या इंदापूर तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल जुन्नर आणि भोर तालुक्यांचा क्रमांक लागतो. दोन्हीही तालुक्यांतील प्रत्येक 61 ग्रामपंचायतीच्या परिसरात मुलींचे प्रमाण कमी आढळून आले आहे. बाल लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असलेल्या संबंधित ग्रामपंचायतींमधील सरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यामध्ये पहिल्यांदा जनजागृती करण्यात येणार आहे, त्यानंतर गावामध्ये प्रत्यक्षात जनजागृती होणार आहे. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी मुलींची भ्रूणहत्या होऊ देणार नाही,’ अशा आशयाच्या फलकाचे अनावरण बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button