हिंगणी गाडा नळ पाणीपुरवठा योजनेत सावळागोंधळ

हिंगणी गाडा नळ पाणीपुरवठा योजनेत सावळागोंधळ
Published on
Updated on

हिंगणी गाडा : पुढारी वृत्तसेवा : अवर्षणग्रस्त पट्ट्यात पाण्याचा उद्भव दाखवून जवळपास दीड कोटी रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा खेळखंडोबा करण्यात आला आहे. परिणामी हिंगणी गाडा ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनेत मोठा सावळागोंधळ झाल्याची माहिती उजेडात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील हिंगणी गाडा हे गाव बारामती तालुक्यातील अवर्षण पट्ट्याच्या सीमारेषेवर आहे. गावाच्या पश्चिमेला सुप्या परगण्यातील दंडवाडी नावाची एक वाडी आहे. या वाडीमध्ये उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण निर्माण होते.

या गावासाठी या वाडीच्या भागात पाण्याच्या उद्भवाचा स्रोत दाखवण्यात आला आणि त्याची निविदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काढण्यात आली. दि. 5 डिसेंबर 2022 ला कामाची निविदा निघून दि. 4 ऑगस्ट 2023 रोजी हे काम पूर्ण करण्याची मुदत होती. यामध्ये पाण्याच्या उद्भवापासून गावामध्ये मुख्य वितरिकेने पाणी आणणे, तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारणे आणि गावाला बंद पाइपातून नळाद्वारे पाणी पोहोचवणे अशी ही योजना होती. जलजीवन मिशनअंतर्गत चालू असलेल्या कामांमध्ये उद्भव व अवर्षण पट्ट्यात घेतल्याचे ठेकेदाराच्या लक्षात आल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी पाण्याचा उद्भव असणारा विषय ऐरणीवर आणला आणि त्यानंतर मोठी खळबळ उडाली.

संबंधित परिसरात पाणी नसताना या ठिकाणी उद्भव निर्माण करणे ही फार मोठी तांत्रिक चूक लक्षात आल्यावर गावकर्‍यांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन या योजनेच्या उद्भवासाठी गावापासून नऊ किलोमीटर दूर असलेल्या पाटस गावाच्या परिसरामध्ये उद्भव निर्माण करण्यात यावा, असा ठराव करून संबंधित विभागाला दिला. तांत्रिक मंजुरीच्या नावासाठी हा आता दौंड पंचायत समितीच्या पाणी विभागातून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण पाणी पुरवठ्याकडून तो आता मुंबईकडे रवाना झाला आहे. चुकीच्या ठिकाणी असलेल्या या योजनेची प्रारंभीच व्यवस्थित चौकशी न केल्याने आज कामाची मुदत संपूनही काम अपूर्ण आहे. ठेकेदाराने मुख्य वितरिका काही प्रमाणात टाकून गावात एका टाकीचे काम पूर्ण केले. दुसऱ्या टाकीचे अद्याप सुरू करायचे आहे, तर तिसर्‍या टाकीसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाल्याची ओरड होत आहे.

दरम्यान दौंड तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा हा ठेकेदारांना पळवाट काढण्यासाठी असल्याचे समोर येत आहे. असे असताना तालुक्यातील कोट्यवधी रुपयांच्या या योजनेचे फलित नागरी हितासाठी नसून केवळ अधिकारी आणि ठेकेदारांच्या भल्यासाठीच तयार केले आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

केवळ टाकीपर्यंत पाणी आणणे हाच उद्देश

गावातील या योजनेमध्ये पाटस या ठिकाणावरून टाकीपर्यंत पाणी आणून सोडणे एवढेच कार्य असून पुढील अंतर्गत नळ पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही स्वरूपाची तरतूद केलेली नाही. या प्रकाराने या गावच्या नळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर येणार आहे.

गावाला पिण्याच्या पाण्याची सोय लवकर व्हावी. आगामी काळात लवकरच उन्हाळा सुरू होणार आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ठेकेदाराने काम लवकर पूर्ण करावे.

– सारिका खोमणे, सरपंच, हिंगणी गाडा

जानाई-शिरसाई कालव्याच्या आधारे दंडवाडी गावाच्या परिसरामध्ये सुरुवातीचा उद्भव या योजनेत नमूद करण्यात आला होता, पण कालव्यालाच पाणी येत नाही. परिणामी या परिसरातच पाण्याची चणचण निर्माण होते. शिवाय मध्ये वनविभागाची जागा असल्याने तिथून जलवाहिनी आणणे कठीण होते. त्यामुळे ग्रामसभेमध्ये एक ठराव घेऊन नवीन उद्भव मिळावे यासाठी प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला आहे. अद्याप त्याबाबत काय झाले याची माहिती मला मिळालेली नाही. ही योजना उद्भवापासून टाकीपर्यंत पाणी आणण्याची आहे. अंतर्गत जलवाहिनी आणि पाणीपुरवठा करणे या योजनेचे काम नाही.

– सोमनाथ थोरात, ग्रामसेवक, हिंगणी गाडा

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news