पोलिसांचे लुटारू त्रिकूट बडतर्फ!

पोलिसांचे लुटारू त्रिकूट बडतर्फ!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नाशिक-मुंबई महामार्गावरील दिवे गावात कार अडवून पोलिस असल्याचे सांगून हवालाचे 45 लाख रुपये लुटणार्‍या पुणे शहर पोलिस दलातील तिघा कर्मचार्‍यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका व्यापार्‍याची ही रोकड होती. पोलिस शिपाई गणेश मारुती कांबळे, गणेश बाळासाहेब शिंदे, दिलीप मारुती पिलाणे अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत. अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी विभागीय चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई केली.
तिघे दत्तवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीला असताना त्यांनी 8 मार्च 2022 रोजी सकाळी हा कारनामा केला होता.

दरम्यान, हा प्रकार उजेडात आल्यानंतर तिघांविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात येऊन विभागीय चौकशी केली जात होती. त्यात दोषी ठरल्याने त्यांना आता बडतर्फ करण्यात आले आहे. गणेश कांबळे याला बाबूभाई सोळंकी याच्याकडून हवालाचे पैसे छत्रपती संभाजीनगरमधून नाशिकमार्गे ठाणे येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्याने गणेश शिंदे आणि दिलीप पिलाणे यांच्याशी संगनमत करून भिवंडीजवळील दिवे गावात हवालाचे पैसे घेऊन जाणारी कार अडविली. पोलिस असल्याचा धाक दाखवून वाहनाची तपासणी करून कारवाई करण्याची भीती दाखवत गाडीतील 45 लाख रुपये घेऊन त्यांना तेथून हाकलून दिले होते.

जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असताना अटक चुकविण्यासाठी गणेश कांबळे याने आजारी नसताना पोलिस निरीक्षकांची दिशाभूल करून सिक पास मिळविला. साप्ताहिक  सुटीच्या दिवशी विनापरवाना मुख्यालय सोडून भिवंडी येथे जाऊन गंभीर गुन्हा केला. गणेश शिंदे याने प्रशिक्षण काळात साप्ताहिक सुटी मिळाली नाही म्हणून साप्ताहिक सुटी घेतो, असे खोटे कारण दाखवून सुटी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केला. दिलीप पिलाणे यानेही पर्यायी साप्ताहिक सुटी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केल्याचे विभागीय चौकशीत सिद्ध झाल्याने त्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

मेहुण्याची टीप अन् तिघा पोलिसांचा प्लॅन

व्यापारी रामलाल मोतीलाल परमार (वय 59, रा. बंगला गल्ली, करमाळ, ता. जि. छत्रपती संभाजीनगर; मूळ पाली, राजस्थान) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. ही घटना 8 मार्च 2022 रोजी सकाळी पावणेसात ते आठच्या सुमारास नाशिक-मुंबई हायवेवरील दिवे गाव येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर भिवंडी येथे घडली होती. परमार हे स्टीलचा व्यवसाय करतात, तर टीप देणारा बाबूभाई सोलंकी हा त्यांचा मेहुणा आहे. त्या वेळी हे तिघे पोलिस कर्मचारी दत्तवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. सोलंकी व पोलिस कर्मचार्‍यांचा परिचय आहे. त्यातूनच सोलंकीने परमार हे व्यावसायिक असून, मोठी रोकड घेऊन भिवंडी येथून जाणे-येणे करीत असतात, अशी माहिती त्यांना दिली. त्यानंतर चौघांनी मिळून परमार यांच्याकडील रोकड लुटण्याची योजना आखली होती.

सोलंकीने परमार यांची संपूर्ण माहिती अगोदरच आरोपी पोलिसांना दिली होती. परमार हे दि. 8 मार्च रोजी आपल्या कारमधून नाशिक येथून रोकड घेऊन मुंबई येथे देण्यासाठी निघाले असता नारपोली पोलिस ठाणे हद्दीत हायवेवरील दिवे येथील पेट्रोल पंपावर दबा धरून बसलेल्या आरोपी पोलिसांनी गाडीला गाडी आडवी लावली. या वेळी सोलंकी बरोबर होता. मात्र, तो दुसरीकडे थांबला होता. आरोपींनी आम्ही पोलिस आहोत, तुमच्या गाडीत मोठी रोकड आहे. तपास करायचा आहे, अशी बतावणी करून पाच कोटी रोकडमधून 45 लाख रुपये काढून घेतले.

त्यानंतर तिघांनी तेथून पळ काढला होता.हा प्रकार घडल्यानंतर परमार यांनी नारपोली पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली होती. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणावरून पोलिसांनी माहिती काढली. त्या वेळी सोलंकी पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे चौकशी केली असता गणेश शिंदे, गणेश कांबळे व मारुती पिलाणे या तीन पोलिसांच्या साथीने परमार यांना लुटल्याची कबुली दिली. यानंतर तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक चेतन पाटील यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात येऊन चौकशी केली. सोलंकी याला अटक केल्याची माहिती आरोपी पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी अगोदरच तेथून पळ काढला होता.

गुन्हा करून लगेच कामावर झाले हजर

तिघे आरोपी पोलिस कर्मचारी कोणी सुटी घेतली, तर कोणी पर्यायी सुटीवर होते. आदल्या दिवशी रात्री 11 वाजता त्यांनी पुणे ते भिवंडी प्रवास करून सकाळी 4 वाजता ते गुन्हा घडलेल्या ठिकाणी दबा धरून बसले होते व गुन्हा करून पुन्हा पुणे येथे कामावर हजर झाले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news