ई-टॉयलेटचा बट्ट्याबोळ! कोट्यवधींचा खर्च पाण्यात | पुढारी

ई-टॉयलेटचा बट्ट्याबोळ! कोट्यवधींचा खर्च पाण्यात

हिरा सरवदे

पुणे : शहरातील अकरापैकी पाच ई-टॉयलेट प्रायोगिक तत्त्वावर चालवण्याची वर्क ऑर्डर (कार्यारंभ आदेश) मे 2023 मध्ये देऊनही गेल्या दहा महिन्यांत पाचपैकी दोन ई-टॉयलेट अद्यापही सुरू होऊ शकले नाहीत. इतर टॉयलेटचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे यासाठी खर्च करण्यात आलेले दोन कोटी रुपयांच्या निधीवर पाणी पडले आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या निधीतून जवळपास दोन कोटी रुपये खर्चून जंगली महाराज रस्ता, मॉडेल कॉलनी, भांडारकर रस्त्यावरील हिरवाई गार्डन, गोखले (फर्ग्युसन) रस्ता, सेनापती बापट रस्ता, विठ्ठलवाडी सिंहगड रस्ता, नीलायम ब्रिज, विमाननगर, वाडिया महाविद्यालयाजवळ आणि तळजाई टेकडी, टिंगरेनगर अशा 11 ठिकाणी अत्याधुनिक स्वयंचलित ई-टॉयलेटच्या 23 सीट बसवण्यात आले. यातील सर्वाधिक ’ई टॉयलेट’ शिवाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 14 मध्ये बसवण्यात आले, तर उर्वरित शहराच्या इतर भागांत बसवण्यात आले. या आधुनिक स्वच्छतागृहांच्या व्यवस्थापनाचे आणि देखभाल-दुरुस्तीचे काम

वर्षभरासाठी एका खासगी

कंपनीकडे देण्यात आले. काही महिने पुरेसे पाणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेमुळे या स्वच्छतागृहांचा वापर वाढला. मात्र, कालांतराने देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने तीन वर्षांपासून सर्व ई-टॉयलेट बंद आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील गोखले (फर्ग्युसन) रस्ता, मॉडेल कॉलनी, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्त्यावरील हिरवाई गार्डन, जंगली महाराज रस्ता हे पाच ई-टॉयलेच प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून 12 मे 2023 रोजी अदित्य इंटरप्रायझेस या ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली.

या पाच ई-टॉयलेटची दुरुस्ती करून ती सुरू करण्यासाठी 14 लाख रुपये ठेकेदाराला देण्यास व प्रतिटॉयलेट प्रतिमहिना 7 हजार रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली.त्यानंतर पाचपैकी तीन टॉयलेटचा वापर सुरू झाला. मात्र, अद्याप जंगली महाराज रस्ता व मॉडेल कॉलनी येथील ई-टॉयलेट सुरू होऊ शकले नाहीत. दरम्यान, पाणी आणि चोरीमुळे ही दोन टॉयलेट सुरू होऊ शकली नाहीत, असे स्पष्टीकरण महापालिका अधिकार्‍यांनी दिले असून, आतापर्यंत केवळ 3 लाख 85 हजार रुपये ठेकेदाराला दिल्याचेही सांगितले.

परिसरातही अस्वच्छता

नागरिकांची गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने शहरात सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालये आणि मुतार्‍या बांधण्यात आल्या. मात्र, वेळच्या वेळी स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जात नसल्याने संपूर्ण परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली असते. असेच चित्र
ई-टॉयलेटच्या परिसरात पाहायला मिळते. टॉयलेटच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे आणि घाणीचे साम—ाज्य आहे.

कॉईन बॉक्स गायब

कोट्यवधी रुपये खर्चून जागोजागी उभारलेल्या या ई-टॉयलेटचे कॉईन बॉक्स भुरट्या चोरट्यांनी फोडले आहेत. हे बॉक्स कटावणीच्या साहाय्याने उचकटण्यात आले आहेत. यासंदर्भात पालिकेच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, या प्रकाराबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.

हेही वाचा

Back to top button