दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयने अंतिम युक्तिवादात खोडले बचाव पक्षाचे मुद्दे | पुढारी

दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयने अंतिम युक्तिवादात खोडले बचाव पक्षाचे मुद्दे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृतदेहावर एक लांबलचक केस होता. मात्र सर्व साक्षीदारांनी आम्हाला याबद्दल काही माहिती नाही, असे सांगितले. डॉ. तावरे यांनी उलटतपासणी दरम्यान तो केस नव्हता तर काळा धागा होता, असे ठामपणे सांगितले असल्याचे सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी शनिवारी अंतिम युक्तिवादा दरम्यान न्यायालयाच्या निदर्शास आणून दिले. दरम्यान, सीबीआयच्या वकिलांनी बचाव पक्षाचे सर्व मुद्दे शनिवारी खोडून काढले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याची सुनावणी न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये ’सीबीआय’तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांचा सुरू असलेला अंतिम युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला. सोमनाथ धायडे याने गजानन मंदिरासमोर गारखेडा येथे हिंदू जनजागरण समितीची बैठक झाली असल्याची साक्ष न्यायालयात दिली होती. बचाव पक्षाने कडा येथे बैठक झाल्यासंदर्भातील कागदपत्रे जलसंपदा खात्याकडून माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविली. आमचं म्हणणं हे होतं की गारखेडा आणि कडा एकच आहे हे दाखविणारा कोणताही पुरावा नाही.

धायडे हा औरंगाबादचाच साक्षीदार होता पण त्याची उलटतपासणी घेण्यात आली नाही. ज्याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत कागदपत्रे दिली तो पुरावा रेकॉर्ड केलेला नाही. डॉ. दाभोलकर यांचा मृतदेह टेम्पोमधून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर फेकण्यात आला असल्याचे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले. त्यानुसार पूर्व बाजूला खुनाची घटना घडली आणि टेम्पो हा पश्चिम बाजूने गेला. त्या वेळी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. म्हणजे जर पश्चिम बाजूने ट्रकमधून मृतदेह नेला असता तर त्या बाजूला रक्त दिसले असते. परंतु, तसा कोणताही पुरावा नसल्याचेही अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी नमूद केले.

डॉ. दाभोलकरांची हत्या, त्यांच्याविषयी आरोपींमध्ये असलेली शत्रुत्वाची भावना, गुन्ह्याचा हेतू, ओळख परेड, अतिरिक्त न्यायालयीन कबुलीजबाब, शवविच्छेदनाच्या नोंदी, फिर्याद, आरोपींवर शस्त्रास्त्र आणि यूएपीए कायद्यान्वये कारवाई, आरोपींच्या मानसिकतेचे विश्लेषण, गुन्ह्याच्या घटनेची पुनर्रचना, रक्षाबंधनाच्या दिवशी अंदुरे आणि कळसकर आमच्यासमवेत असल्याचा बहिणींनी केलेला दावा अशा मुद्द्यांवर सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी अंतिम युक्तिवाद केला. दरम्यान, 22 फेब्रुवारी रोजी दाभोलकर कुटुंबीयांचे म्हणणे लिखित स्वरूपात त्यांचे वकील अभय नेवगी न्यायालयात सादर करतील.

हेही वाचा

Back to top button