यंदा दहावी-बारावीच्या 31 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा : परीक्षेची तयारी पूर्ण | पुढारी

यंदा दहावी-बारावीच्या 31 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा : परीक्षेची तयारी पूर्ण

गणेश खळदकर

पुणे : यंदा बारावीचे 15 लाखांवर, तर दहावीचे 16 लाखांवर असे एकूण 31 लाखांवर विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी तब्बल 1 लाख 80 हजारांवर मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे.  परीक्षांची आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, परीक्षा सुरळीत पार पाडण्यावर राज्य मंडळाचा भर असल्याचे राज्य मंडळातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी राज्य मंडळाने यंदा जोरदार तयारी केली आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार

आहे. त्यानुसार दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी कॉपी केसेस, बोगस विद्यार्थी सापडणे, समूह कॉपी, पेपर व्हायरल होणे असे प्रकार घडताना दिसतात. यंदा मात्र राज्य मंडळ गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणार आहे. त्यासाठी राज्य मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर यंदादेखील परीक्षेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत.

बारावीच्या परीक्षा 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे, तर दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेत यंदा कला आणि वाणिज्य शाखेच्या दोन्ही विद्यार्थ्यांएवढे मिळून एकट्या विज्ञान शाखेचे विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. राज्यात पुणे आणि मुंबईचे सर्वाधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. दहावी आणि बारावीची परीक्षा देणार्‍यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

रनर म्हणून विश्वासू व्यक्ती

यंदा प्रात्यक्षिक परीक्षेचे ऑनलाइन गुणांकन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रनर अर्थात कष्टोडीयनला कष्टडीतून पेपर घेताना जीपीएस ऑन करायचे आहे. त्याचबरोबर स्वत:च्या मोबाईलच्या माध्यमातून व्हिडीओ शूटिंग करावे लागणार आहे. रनर म्हणून खात्रीशीर व्यक्तीचीच नियुक्ती यंदा करण्यात आली आहे.

भरारी पथकाला यंदा आयकार्ड

परीक्षा काळात फिरणार्‍या भरारी पथकातील सदस्यांना यंदा नवीन आयकार्ड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पथकात वरिष्ठ शिक्षकांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भरारी पथकातील सदस्यदेखील संयमाने कारवाई करणार असून, विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत. त्याचबरोबर आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करून त्याचा अहवाल तातडीने राज्य मंडळाला कळविणार आहेत.

परीक्षेसंदर्भात सर्व घटकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्कात राहून आवश्यक सर्व सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनीदेखील कोणताही ताण न घेता परीक्षेला सामोरे जाणे गरजेचे आहे. परीक्षा कोणत्याही गैरप्रकाराशिवाय सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

– शरद गोसावी, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.

हेही वाचा

Back to top button