

भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा म्हणजे 1951-52 साली साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे निरक्षर लोकांना पक्ष लगेच समजावा या हेतूने त्यावेळी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले होते. चौथ्या लोकसभेपर्यंत काँग्रेसने दोन बैलांची जोडी या चिन्हावर निवडणुका लढवल्या. 1967 नंतर काँग्रेसमध्ये सिंडिकेट आणि इंडिकेट असे दोन गट झाले. त्यानंतर 1969 साली निवडणूक आयोगाने दोन बैलांची जोडी हे निवडणूक चिन्ह गोठवले. पुढे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला गाय आणि वासरू हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले. 1971 च्या लोकसभा निवडणुकीत गाय वासरू या चिन्हासह लढून इंदिरा गांधी यांनी मोठा विजय मिळवला. तथापि, आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी माजली. त्यानंतर निवडणूक आयोगाने गाय वासरू हे निवडणूक चिन्ह गोठवले. मग इंदिरा गांधींनी हात हे निवडणूक चिन्ह निवडले.
देशावर गेल्या दहा वर्षांपासून सलग राज्य करीत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हांचा इतिहासही लक्षवेधी आहे. 21 ऑक्टोबर 1951 रोजी दिल्लीत जनसंघाची स्थापना झाली. त्यावेळी जनसंघाचे निवडणूक चिन्ह पणती होते. 1977 पर्यंत ही व्यवस्था कायम होती. नंतर जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सगळे काँग्रेस विरोधक एकत्र आले. या पक्षाचे निवडणूक चिन्ह होते नांगरधारी शेतकरी. नंतर जनता पक्षही दुभंगला आणि 1980 साली अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि या पक्षाने कमळ या चिन्हाची निवड केली. हेच चिन्ह भाजपची प्रमुख ओळख बनले आहे.
कॉलीफ्लॉवर, कात्री, हिरवी मिरची, केक, फुगा, डोली, आईस्क्रीम अशा मजेदार चिन्हांचा निवडणूक चिन्हात समावेश आहे. एखाद्या उमेदवाराने कॉलीफ्लॉवरला मते द्या, अशी घोषणा दिली, तर कोणालाही हसू येईल.
हेही वाचा :