बारामती : पुढारी वृत्तसेवा – भाजपने अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आजवर कधीही बारामतीत न झालेली पवार विरुद्ध पवार ही लढत घडविण्याचा प्रयत्न चालविला आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. बारामतीत पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपने आजवर आखलेले डाव यशस्वी झाले नव्हते. परंतु आता अजित पवार यांच्या माध्यमातून ते हे साध्य करू पाहत आहेत.
संबंधित बातम्या –
बारामतीत अनेक वर्षे भाजपला यश मिळत नाही. त्यासाठी त्यांना पवार विरुद्ध पवार अशी लढत करायची होती, त्याचेही प्रयत्न यापूर्वी झाले. पण यश येत नव्हते. आता पक्ष आणि कुटुंब फोडून त्यांनी हे करायचा प्रयत्न केला. भविष्यात लोकच त्यांना उत्तर देतील असे आमदार रोहित पवार म्हणाले.
पुढे म्हणाले, बारामतीमध्ये अजित दादांचे झालेले भाषण कोणालाच आवडलेले नाही. ते महाराष्ट्रातही कोणाला आवडले नाही आणि बारामतीकरांनाही आवडलेले नाही. ज्या पद्धतीने ते बोलत होते तिथे मला असे वाटले होते की, लोकसभेची लढत ही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार होईल. सुप्रिया ताई या ठिकाणी खासदार आहेतच. आता विरोधात खासदार देण्याची जबाबदारी भाजपने मुद्दामहून अजित दादांवर टाकलेली आहे. जे आजपर्यंत भाजपला जमलेले नव्हते ते त्यांनी आता दुर्दैवाने कुटुंब आणि पक्ष फोडून ते करण्याचा प्रयत्न केला आहे. पण जेव्हा त्यांच्याकडून अधिकृतपणे याची घोषणा होईल, तेव्हाच मला यावर सविस्तर बोलता येईल. उमेदवारी दिल्यानंतर पुढे काय करायचे हे लोक ठरवतील, पवारसाहेब ठरवतील असे रोहित पवार म्हणाले.