..अन् आयोगाच्या कार्यालयातून प्रकाश आंबेडकर बाहेर! | पुढारी

..अन् आयोगाच्या कार्यालयातून प्रकाश आंबेडकर बाहेर!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज सध्या पुण्यात सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची उलट तपासणी घेण्यासाठी त्यांना सोमवारी (दि.12 ) पाचारण केले होते. मात्र, उलट तपासणीदरम्यान विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिशिर हिरे आणि आंबेडकर यांच्यात वाद झाले आणि आंबेडकर आयोगाच्या कार्यालयातून बाहेर पडले. आंबेडकर हे उलट तपासणीसाठी आयोगासमोर सोमवारी आले होते. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. हिरे यांनी त्यांची उलट तपासणी घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच 2 जानेवारी 2018 रोजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि 3 जानेवारी 2018 रोजी बंद पुकारला होता.

या बंददरम्यान महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखल केले होते. याबाबत हिरे यांनी आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. बंदच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असे अ‍ॅड. हिरे यांनी सांगितले. त्यावर आंबेडकर यांनी आक्षेप घेत हा आयोग 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराबाबत स्थापन केला आहे. त्यामुळे 3 जानेवारी 2018 रोजी राज्यात झालेल्या परिस्थितीवर प्रश्न विचारून सरकारी वकील दिशाभूल करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी या वेळी केला. मात्र, आयोग हा हिंसाचार आणि त्याचे परिणाम यासाठी स्थापन केल्याचे अ‍ॅड. हिरे यांनी सांगत आंबेडकर यांची उलट तपासणी घेण्यास पुन्हा सुरुवात केली.

मात्र, आंबेडकर हे अधिक काही बोलण्यास नकार देत तेथून बाहेर पडले. त्यामुळे आंबेडकर यांची उलट तपासणी अर्धवट राहिली.
दरम्यान, माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमामधील दंगल पोलिसांनी घडवली आहे. आयोगासमोर हा विषय वळवण्याचा प्रयत्न होत होता आणि ते माझ्या तोंडून वदवून घ्यायचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून मी आयोगाला सांगितले की, मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी दिली आहे. आता मी थांबतो.

मोदी रिंगमास्टर; नेत्यांनाही नाचवणारेे!

उलट तपासणीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आमच्या पक्षात मंत्री होते, आमदार होते ते निघून गेले. पण, पक्ष म्हणून काही परिणाम झाला नाही. एखाद्याचे पक्ष सोडून जाणे हे धक्कादायक असते. मात्र, त्याने पक्षावर काही परिणाम होत नाही. नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे नेते चौकशीखाली आहेत, त्यांना ते नाचवणार आहेत. वरिष्ठ नेते किंवा दुसर्‍या फळीतील नेत्यांनाही मोदी नाचवणार आहेत.

भाजप भयग्रस्त

देशभरात काल साडेचारशे ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. या धाडी अराजकीय होत्या. भाजप कितीही म्हणत असेल, की आम्ही 400 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत, पण ते भीतीपोटी आहे. भीती निर्माण व्हावी म्हणून ते राजकीय आणि अराजकीय (व्यापारी) यांच्यावर देखील धाडी टाकत आहेत. भाजप ही भयग्रस्त झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार करून लोकांनाही भयग्रस्त करून आपल्याला जिंकता येईल का? अशी त्यांची खेळी आहे, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा

Back to top button