शिक्षकांचा ताण कमी; तासाला तपासणार तीनच पेपर : सीबीएसईचा निर्णय | पुढारी

शिक्षकांचा ताण कमी; तासाला तपासणार तीनच पेपर : सीबीएसईचा निर्णय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. या परीक्षेला बसणार्‍या लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दिलेल्या वेळेत तपासणे हा शिक्षकांसाठी बर्‍याच वेळा ताणाचा विषय ठरतो. यामुळे काही वेळा उत्तरपत्रिका तपासताना काही त्रुटी राहून जातात. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यामध्ये महत्त्वाचे विषय फक्त पदव्युत्तर शिक्षक तपासतील, एक शिक्षक दररोज फक्त 20 मुख्य परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणार आहेत, तसेच गुणवत्ता मूल्यमापनासाठी शिक्षक दर तासाला तीन उत्तरपत्रिका तपासतील, असा निर्णय सीबीएसईतर्फे घेण्यात आला आहे.

दहावीच्या विज्ञान आणि सामाजिकशास्त्राच्या परीक्षेतील गुणवत्तेच्या मूल्यमापनासाठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात पात्रता असलेले पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स (पीजीटी) आणि ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर्स (टीजीटी) शिक्षक सहभागी केले जातील. मंडळाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापन पद्धतीचा विस्तार केला आहे. याशिवाय, मूल्यमापनकर्त्याला मदत करण्यासाठी भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयात अध्यापन आणि पात्रता असलेले पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी, मुख्य विषयांच्या 20 उत्तरपत्रिका आणि उर्वरित विषयांमध्ये 25 उत्तरपात्रिकांचे प्रतिदिन मूल्यमापन केले जाईल. शिवाय मूल्यांकनकर्त्यासोबत एक सहाय्यक ठेवला आहे, जो मूल्यमापनानंतर सर्व प्रश्नांची बेरीज आणि मूल्यमापन बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी उत्तरपत्रिका तपासेल. सीबीएसईने शाळाप्रमुखांना मूल्यमापन करण्यास सक्षम असलेल्या शिक्षकांची नावे आणि माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मूल्यमापन केंद्रावर रविवार वगळता सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मूल्यांकनाचे काम केले जाणार आहे. ही 8 तासांची वेळ पूर्ण झाल्याशिवाय शिक्षकांना मूल्यांकन केंद्र सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button