पोस्टातील पीपीएफ खाते बँकेमध्ये ट्रान्स्फर करायचंय? जाणून घ्या माहिती | पुढारी

पोस्टातील पीपीएफ खाते बँकेमध्ये ट्रान्स्फर करायचंय? जाणून घ्या माहिती

जगदीश काळे

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय मानला जातो. आपल्या भविष्यातील आर्थिक गरजा आणि आयकरातुन मिळणारी सुट या दोन्हीचा विचार करता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरते.

रिटायरमेंट फंड या द़ृष्टीने पीपीएफ मधील गुंतवणूक सर्वाधिक फायदेशीर मानली जाते. सध्या पीपीएफ मधील गुंतवणुकीवर वार्षिक 7.1 टक्के एवढे व्याज दिले जाते. त्याचबरोबर यातील गुंतवणुकीचा मोठा फायदा म्हणजेे आपल्याला चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळत राहते. आयकरातून सूट मिळण्यात पीपीएफमध्ये गुंतवणूक पात्र आहे. त्याचबरोबर 15 वर्षांनंतर आपल्याला या गुंतवणुकीचे पैैसे परत मिळतात तेव्हा त्यावरही कर लावला जात नाही. पीपीएफचे खाते आपल्याला सरकारी बँकेबरोबरच पोस्टामध्येही उघडता येते.

बँकेत ट्रान्स्फर केल्याचे फायदे

पोस्टामध्ये असलेले पीपीएफचे खाते बँकेमध्ये ट्रान्स्फर करण्याची सुविधा आहे. असे केल्याने गुंतवणूकदाराला काही फायदे मिळू शकतात. पोस्टातील पीपीएफ खाते बँकेत ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया अत्यत सोपी आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये नियमित गुंतवणूक केल्यास नोकरदाराला आपल्या निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्नाचा स्रोत तयार करता येतो. यातील गुंतवणुकीवर अन्य गुंतवणुकीपेक्षा तुलनेनेे अधिक उत्पन्न मिळते असे दिसून येते. पोस्टातील पीपीएफ खाते आपण बँकेमध्ये ट्रान्स्फर केल्यास ते खाते आपण नेट बँकिंगच्या प्रणालीशी जोडू शकतो. पोस्टातील पीपीएफ खात्यात पैसे भरण्यासाठी आपल्याला पोस्टामध्ये जावे लागते. त्याचबरोबर आपले पासबुक भरून घेण्यासाठीही आपल्याला पोस्टात जावे लागते.

आपण पोस्टातील खाते बँकेत ट्रान्स्फर केले, तर आपल्याला ऑनलाईन पासबुक मिळू शकते. बँकेत पीपीएफचे पैसे भरण्यासाठी स्वत:ला जावे लागत नाही. आपण नेट बँकिंगद्वारा आपल्या एका खात्यातून पीपीएफ खात्यात पैसे भरू शकतो. पोस्टातील पीपीएफ खाते बँकेत ट्रान्स्फर करीत असताना बँकेच्या कोणत्या शाखेत पीपीएफ खाती उघडली जातात हे माहीत करून घ्या. आपल्या बँकेची शाखा निश्चित केल्यानंतर गुंतवणूकदाराला एका फॉर्म भरून द्यावा लागतो तसेच पोस्ट ऑफिसमध्येही आपल्याला ट्रान्स्फरसंबंधी फॉर्म सादर करावा लागतो. टपाल खात्याकडे दिलेल्या फॉर्ममध्ये तुम्हाला बँकेच्या कोणत्या शाखेत तुमचे पीपीएफ खाते ट्रान्स्फर करायचे आहे, याची माहिती भरून द्यावी लागते. त्या फॉर्मबरोबर पोस्ट खात्याकडून मिळलेले पासबुक जोडावे लागते. तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर टपाल खात्याकडून तुमचे पीपीएफ खाते बंद करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर पोस्टाकडून तुमच्या पीपीएफ खात्याबाबतची सर्व कागदपत्रे बँकेकडे पाठविली जातात. असे केल्यानंतर आपले पोस्टातील पीपीएफ खाते बंद झाले असे समजले जाते.

पोस्टातून बँकेकडे आपले पीपीएफ खाते ट्रान्स्फर करण्यासाठी साधारणतः 10 दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर आपल्याला त्या बँकेत पीपीएफ खाते उघडण्यासाठी जावे लागते. आपले पोस्टातील खाते बँकेत ट्रान्स्फर झाल्यानंतर बँकेकडून आपल्याला नवे पासबुक दिले जाते. नव्या पासबुकात पोस्टाकडून ट्रान्स्फर झालेला उल्लेख असतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करणे सध्याच्या नोकरदारांच्या द़ृष्टीने आवश्यक बनले आहे. सरकारी कमर्र्चार्‍यांना निवृत्त झाल्यानंतर सरकारकडून पेन्शन मिळते; मात्र खासगी कंपनीच्या नोकरदारांना निवृत्ती वेतन मिळत नाही. अशा मंडळींना निवृत्तीनंतर निश्चित उत्पनाची काहीच सोय नसते. त्यांच्याकरिता सार्वजनिक भविष्यनिवाह निधीमध्ये गुंतवणूक करणे हा उत्तम पर्याय मानला जातो.

Back to top button