ईव्हीएम चोरी प्रकरण : दोन सदस्यीय चौकशी समितीची घटनास्थळास भेट

ईव्हीएम चोरी प्रकरण : दोन सदस्यीय चौकशी समितीची घटनास्थळास भेट

सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तहसील कार्यालयाच्या बंदिस्त आवारातील पोलिस गार्डशेजारील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेली मतदान यंत्रे (कंट्रोल युनिट) दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याप्रकरणी चौकशी समितीने शनिवारी (दि. 10) घटनास्थळाची पाहणी केली. विभागीय आयुक्त सी. एल. पुलकुंडवार व कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी माहिती घेतली.

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील तहसील कार्यालयातील ईव्हीएम चोरीप्रकरणी तीन वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबित करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने केल्या होत्या. यानंतर शनिवारी चौकशी समितीने प्रत्यक्ष घटनास्थळावर येऊन पाहणी केली. निवडणूक आयोगाने या घटनेबाबत वा निलंबित केलेल्या अधिकार्‍यांबाबतचा अहवाल सोमवार (दि. 12) पर्यंत देण्याच्या सूचना या दोनसदस्यीय समितीला दिल्या आहेत. त्यानुसार ही चौकशी करण्यात आली. यानंतर साडेचार वाजता हे पथक पुण्याकडे रवाना झाले.

माध्यमांशी बोलण्यास नकार; चोरीबाबत गूढ वाढले

चौकशी समितीने सुरुवातीला माध्यमांशी आपण बोलणार असल्याचा निरोप दिला होता. मात्र, यानंतर माघारी जाताना मात्र माध्यमांशी बोलण्यास दोन्ही अधिकार्‍यांनी नकार दिला. त्यामुळे या चोरीप्रकरणी अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. या चोरीप्रकारात केवळ ईव्हीएम मशिन चोरीला गेले की अन्य काही? चोरांचा उद्देश नक्की काय होता? स्ट्राँग रूममधील आणखी काही चोरीला गेले आहे का? कोणत्या ऐतिहासिक वस्तू चोरीला गेल्या आहेत का? चोर पकडले, चोरीला गेलेला माल हस्तगत केला; मग पोलिस आणखी कोणती चौकशी करीत आहेत? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. वरिष्ठ अधिकारी बोलण्यास टाळाटाळ करीत असल्याने या चोरीबाबत गूढ वाढत चालले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news