शरद मोहोळ खून प्रकरण : ऑडिओ क्लीपमध्ये कटासंदर्भात माहिती | पुढारी

शरद मोहोळ खून प्रकरण : ऑडिओ क्लीपमध्ये कटासंदर्भात माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शरद मोहोळ खून प्रकरणात मुख्य सूत्रधारांसह अन्य आरोपींच्या मोबाईलच्या विश्लेषणातून सहा ऑडिओ क्लिप मिळाल्या असून, त्यामध्ये या गुन्ह्याच्या कटासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे. त्यातून आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिली. या वेळी, ‘मोक्का’ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी मुख्य सूत्रधार गणेश मारणे व विठ्ठल शेलारसह साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले आणि रामदास मारणे यांच्या कोठडीत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली.

मोहोळचा पाच जानेवारीला कोथरूडमधील सुतारदरा परिसरात खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींची मोक्का कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यामुळे या आरोपींना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींच्या 19 हजार 827 ऑडिओ क्लीप आणि कॉल रेकॉर्डिंग मिळाले असून, त्यापैकी 12 हजार 320 क्लीपचे तांत्रिक विश्लेषण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये सहा महत्त्वाच्या ऑडिओ क्लीप्सचा तपास सुरू आहे.

याशिवाय आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या सात गाड्या जप्त करण्यात आल्या असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यातून या गुन्ह्याची साखळी उघडकीस येण्याची शक्यता असून, तपासातील प्रगती लक्षात घेता आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास अधिकारी सुनील तांबे व विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी न्यायालयाकडे केली. या वेळी बचाव पक्षाने आरोपींची कोठडी वाढविण्यास विरोध केला. पोलिसांनी सादर केलेली कारणे जुनीच असून, ऑडिओ क्लीप्सचे विश्लेषण करण्यासाठी व आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यासाठी कोठडी वाढविण्याची गरज नाही, असा युक्तिवाद केला.

हेही वाचा

Back to top button