आंतरराष्‍ट्रीय : हुती बंडखोरांमुळे तेल व्यापार संकटात

आंतरराष्‍ट्रीय : हुती बंडखोरांमुळे तेल व्यापार संकटात

हुती ही इराणने पोसलेली व वाढवलेली एक दहशतवादी संघटना आहे. इराणने हुतीप्रमाणेच लेबनॉनमध्ये हेजबोल्ला व इस्रायलमध्ये हमास या दहशतवादी संघटना बांधल्या आहेत. या संघटनांचे कंबरडे मोडायचे असेल, तर इराणवरच थेट हल्ला केला पाहिजे, असे मत इस्रायल व अमेरिकेत व्यक्त होत असते.

इस्रायल-हमास युद्धात येमेनमधील हुती बंडखोर उतरल्यामुळे या युद्धाला एक वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहेत. इस्रायल हमासवरील हल्ले थांबवत नाही, तोपर्यंत हुती बंडखोरांनी तांबडा समुद्र आणि इराणच्या आखातातील अमेरिकन व पाश्चात्त्य जहाजांची वाहतूक विस्कळीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे हुती बंडखोर किंवा दहशतवादी येमेनमधील आपल्या तळांवरून तांबडा समुद्र व इराणच्या आखातातून ये-जा करणार्‍या व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले करीत आहेत. यामुळे या दोन्ही समुद्रांतून होणारा जागतिक व्यापार संकटात सापडला आहे. या दोन्ही समुद्रांतून प्रामुख्याने आखाती देशांतील तेलाची वाहतूक जगातील देशांना होते. विशेषत:, भारत व चीन या दोन मोठ्या तेल ग्राहक देशांना या भागातून अरब देश तेल पाठवतात.

हुती बंडखोर फक्त पाश्चात्त्य जहाजांना लक्ष्य करीत असल्याचा दावा करीत असले, तरी त्यांचे हल्ले स्वैरपणे चालू आहेत व त्यात सर्वच देशांची जहाजे सापडत आहेत. उलट अमेरिकन युद्धनौकांनी हुतींचे अनेक हल्ले विफल करून आपल्या युद्ध व व्यापारी नौकांचा बचाव केला आहे. चीनचा व भारताचा खरे तर पॅलेस्टिनींना व इराणला पाठिंबा आहे; तरीही त्यांच्या तेल वाहतुकीवर या हल्ल्यांचा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे चीनने व भारताने इराणशी संपर्क साधून हुतींचे हल्ले आपल्या जहाजांवर होऊ नयेत, असे सांगितले आहे.

हुती ही इराणने पोसलेली व वाढवलेली एक दहशतवादी संघटना आहे. येमेनवरील सौदी अरबचा प्रभाव कमी करण्यासाठी इराणने येमेनमधील सरकारविरोधी बंडखोरांना एकत्र करून ही संघटना बांधली आहे. इराणने हुतीप्रमाणेच लेबनॉनमध्ये हेजबोल्ला व इस्रायलमध्ये हमास या दहशतवादी संघटना बांधल्या आहेत. या सर्व संघटना इराणच्या वतीने अखाती देशांत दहशतवादी हालचाली करीत असतात. या हल्ल्यात इराण कुठेही प्रत्यक्ष सहभागी नसतो; पण या संघटनांचे कंबरडे मोडायचे असेल, तर इराणवरच थेट हल्ला केला पाहिजे, असे मत इस्रायल व अमेरिकेत व्यक्त होत असते. इस्रायल अधूनमधून इराणवर हल्ले करीतही असतो. इराणचे लष्करी अधिकारी व अणुशास्त्रज्ञ इस्रायलने असे हल्ले करून ठारही केले आहेत.

हुतींना निष्प्रभ करण्यासाठी अमेरिकेने आपल्या अरबी समुद्रातील व भू मध्य सागरातील तैनात विमानवाहू नौकांवरून येमेनमधील हुती तळांवर हल्ले केले आहेत; पण हे हल्ले फारसे प्रभावी ठरताना दिसत नाहीत. कारण, हुती बंडखोर कुठल्या विशिष्ट तळांवरून हे हल्ले करताना दिसत नाहीत. ते कुठूनही अथवा अनपेक्षित ठिकाणांवरून ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले करताना दिसत आहेत. त्यामुळे या हल्ल्यांचे मूळ असलेल्या इराणवरच हल्ले करावेत, असा मतप्रवाह आहे; पण अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका तोंडावर आलेल्या असताना असे हल्ले करण्यास अमेरिका एकीकडे कचरत आहे, तर दुसरीकडे अध्यक्ष बायडेन हे हल्ले थांबविण्यासाठी काहीच करीत नाहीत, अशीही टीका होत आहे. इस्रायलने मात्र हमासचा खात्मा झाल्यावर हेजबोल्ला व हुतीला लक्ष्य करण्याचे ठरविले आहे.

दरम्यान, हे हल्ले थांबलेच नाहीत, तर सर्व देशांना आपली तेल वाहतूक आफ्रिकेला वळसा घालून करावी लागेल. त्यामुळे वाहतूक खर्च वाढून तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेली युरोपची अर्थव्यवस्था संकटात सापडू शकते. दुसरे म्हणजे, अमेरिका युक्रेनला मदत करण्यात, तसेच तैवानवरील संभाव्य चिनी हल्ल्याला तोंड देण्यात गुंतलेली असताना तिच्यापुढे हे नवे आव्हान उभे राहिले आहे. या हल्ल्यांमुळे अध्यक्ष बायडेन यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे निवडणूकही अवघड होण्याची शक्यता आहे. भारतात झालेल्या जी-20 परिषदेत भारत, आखाती देश व युरोप असा आर्थिक मार्ग सुचवण्यात आलेला होता, हा मार्गही आता अडचणीत आला आहे. त्याचा फटका भारताला बसणार आहे.

हुतीच्या जोडीने हेजबोल्ला या लेबनीज इस्लामी दहशतवादी संघटनेनेही इस्रायलवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. याचा अर्थ इस्रायल फक्त पश्चिमेकडच्या गाझापट्टीवरच युद्ध करीत आहे, असा नाही तर उत्तर व पूर्वेकडील आघाडीवरही हेजबोल्ला आणि हुती दहशतवाद्यांशी सामना करीत आहे.

इराणने इस्रायलला अटकाव करण्यासाठी हमास, हेजबोल्ला, हुती यासारख्या दहशतवादी संघटना उभ्या केल्या आहेत व जोपासल्या आहेत. हमास ही संघटना इस्रायलच्या पोटातील गाझापट्टीत असल्यामुळे तिच्यावर इस्रायलची करडी नजर आहे; पण हेजबोल्ला व हुती या संघटना इस्रायलच्या बाहेर अन्य देशात असल्यामुळे इस्रायल या संघटनांवर नजर ठेवू शकत नाही. असे असले तरी इस्रायली गुप्तचरांकडे या दोन्ही संघटनांच्या कार्याची विस्तृत माहिती आहे. हेजबोल्ला ही संघटना प्रामुख्याने लेबनॉनच्या भूमीतून काम करते. लेबनॉन हा इस्रायलच्या उत्तरेकडे असलेला छोटा देश आहे. तेथील सरकारचा हेजबोल्लाला पाठिंबा नाही; पण हेजबोल्ला बळेबळेच लेबनॉनमध्ये ठाण मांडून बसलेली संघटना आहे.

तिला सर्वप्रकारचा शस्त्र व अर्थपुरवठा इराणकडून होतो. त्यामुळे ही एक भक्कम, धोरणी व कसलेली संघटना आहे. याआधीच्या अरब-इस्रायल युद्धात इस्रायली सैन्याला हेजबोल्लाचा सामना करावा लागला होता, त्यात हेजबोल्लाने कडवी लढत दिली होती. गाझापट्टीतून इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हल्ला झाल्यानंतर इस्रायलने हमासचा बीमोड करण्याचा निर्णय घेतला खरा; पण त्यात हेजबोल्ला व हुती या संघटना दुसरी आघाडी उघडून अडथळे आणणार याची इस्रायल व अमेरिकेला कल्पना होती. हमासवरील हल्ले करताना हेजबोल्लाशीही दोन हात करणे अवघड जाणार, याची इस्रायल व अमेरिका या दोघांनाही कल्पना होती, त्यामुळेच हेजबोल्लाला अटकाव करण्यासाठी अमेरिकेने आपल्या दोन विमानवाहू नौकांचा ताफा पूर्व भू मध्य समुद्रात पाठवला. हेतू हा की, इस्रायल गाझापट्टीत गुंतला असताना हेजबोल्लाने उत्तर सीमेवर हल्ले सुरू केले, तर या विमानवाहू ताफ्यातील बॉम्बफेकी विमाने हेजबोल्लाच्या लेबनॉनमधील ठाण्यांवर हल्ले करून हेजबोल्लाला रोखू शकतील; पण असे असले तरी हेजबोल्लाने आपले हल्ले रोखलेले नाहीत.

इस्रायलने आता गाझापट्टीच्या दक्षिण भागात हल्ले सुरू केल्यानंतर हेजबोल्लाने इस्रायलवरील क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांची संख्या वाढवली आहे. हेजबोल्ला इस्रायली सैन्याच्या ठाण्यांवर रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांनीही हल्ले करीत आहे. या हल्ल्यांनंतर अमेरिका व इस्रायलने लेबनॉनमधील हेजबोल्लाच्या ठाण्यांवर हल्ले सुरू केले आहेत; पण हेजबोल्लानेही लेबनॉनमध्ये भुयारी खंदकांचे जाळे निर्माण केले आहे व त्या ते दडून बसले आहेत. त्यामुळे हेजबोल्लाशी लढणे हे सोपे काम नाही. सध्या तरी इस्रायलने गाझापट्टीतील हल्ल्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. हमासचा नि:पात होईपर्यंत हेजबोल्लाला फक्त रोखून धरायचे, अशी इस्रायलची नीती दिसते; पण एकदा हमासचा नि:पात झाला आणि गाझापट्टीवर इस्रायली सैनिकांचे वर्चस्व प्रस्थापित झाले की, हेजबोल्लाचा समाचार घेण्याचा इस्रायलचा विचार असू शकतो.

हेजबोल्ला ही इराणने विशिष्ट हेतूने निर्माण केलेली दहशतवादी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून पश्चिम आशियातील पाश्चात्त्य वर्चस्वाला शह देण्याचा इराणचा प्रयत्न आहे. इराकमधील सद्दाम हुसेनची राजवट नष्ट झाल्यानंतर तेथे शियांचे वर्चस्व वाढले, हे इराणसाठी सोयीचे ठरले आहे. येमेनमध्येही हुती या दहशतवादी संघटनेला जोपासून इराणने आपले प्रभाव क्षेत्र विस्तारले आहे. कतारची राजवट आपण तटस्थ आहोत असे दाखवत असली, तरी ती इराणला अनुकूल आहे. पश्चिम आशियात इराणला खरे आव्हान आहे ते सौदी अरबचे, तसेच संयुक्त अरब अमिरातचे. हे दोन्ही देश सुन्नीबहुल आहेत व ते अमेरिकेच्या निकट आहेत.

अमेरिकेने अब्राहम करार घडवून आणल्यानंतर या दोन्ही देशांचे इस्रायलशी संबंध सुधारले आहेत. त्यातच भारत, अरबी आखात ते युरोप असा आर्थिक महामार्ग टाकण्याचा विचार पुढे आला आहे. यामुळे इराणचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. या अब्राहम कराराला सुरुंग लावण्यासाठीच इराणने हमासला हाताशी धरून इस्रायलवर दहशतवादी हल्ला घडवून आणला, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळेच हमासवरील कारवाई पूर्ण झाल्यावर अमेरिका व इस्रायल हेजबोल्लाला लक्ष्य करण्याच्या निमित्ताने इराणलाही लक्ष्य करणार का, असा प्रश्न चर्चिला जात आहे. हमास युद्धाचे निमित्त करून अमेरिकने आपले आरमार भू मध्य सागरात, तांबड्या समुद्रात आणि अरबी समुद्रात इराणच्या आखाताच्या मुखाशी आणून ठेवले आहे. हा चक्रव्यूह इराणची कोंडी करणारा आहे. त्यामुळे गाझापट्टीतील कारवाई संपली, तरी पश्चिम आशियातील युद्ध परिस्थिती संपेल, असे वाटत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news