हवा प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्राचे कोल्हापूरला 13 कोटी | पुढारी

हवा प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्राचे कोल्हापूरला 13 कोटी

आशिष शिंदे

कोल्हापूर : स्वच्छ हवा अशी असणारी कोल्हापूरची ओळख वाढत्या प्रदूषणामुळे धुरकटली आहे. यामुळे कोल्हापूरचा समावेश प्रदूषित शहरांच्या यादीत कायम आहे. त्यामुळे हवा प्रदूषण नियंत्रणसाठी केंद्र सरकारने आणखी 13 कोटी 82 लाख रुपयांचा निधी कोल्हापूरला दिला आहे. गेल्या चार वर्षांत हवा प्रदूषण नियंत्रणासाठी 24 कोटी 11 लाखांचा निधी केंद्राने दिला असून, यातून आता काही ओपन स्पेसमध्ये ग्रीन पार्क तसेच झूम प्रकल्पाभोवती मोठ्या झाडांचे संरक्षित क्षेत्र उभारले जाणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत कोल्हापूरला निधी दिला जात आहे. डिसेंबर 2023 अखेर केंद्राकडून 13 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. आतापर्यंत एकूण निधीपैकी सुमारे 2 कोटी निधी खर्च करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

शहरातील हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर 2.5 व पार्टिक्युलेट मॅटर 10 चे प्रमाण वाढले आहे. हवेमध्ये वाढलेले श्वसनीय धूलिकणांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी शहरात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. यांतर्गत प्रदूषणाचा हॉटस्पॉट बनलेल्या दाभोळकर कॉर्नर येथे एअर प्युरिफिकेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे.

याशिवाय वाहनांच्या रहदारीमुळे वाढलेले धूलिकणांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी गंगावेश, फोर्ड कॉर्नर व उमा टॉकीज परिसरात मिस्ट टाईप फाऊंटन उभारण्यात आले आहेत, तर बिंदू चौक येथे व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आले आहे.

केंद्राकडून मिळालेल्या निधीमधून फ्लाय ओव्हरखाली गार्डन करण्यात येणार आहे. गॅस दाहिनीचे काम अंतिम टप्यात आहे. याशिवाय कचरा उठाव करण्यासाठी सीएनजी टिपर खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील काही ओपन स्पेसमध्ये ग्रीन पार्क तयार करण्यात येणार असून झूम प्रकल्पाभोवती मोठ्या झाडांचे संरक्षित क्षेत्र उभारण्यात येणार आहे.

प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना :

बिंदू चौक येथे व्हर्टिकल गार्डन
दाभोळकर कॉर्नर येथे एअर प्युरिफिकेशन सिस्टीम
तीन ठिकाणी मिस्ट टाईप फाऊंटन

Back to top button