गोळीबाराची मालिका संपेना : पुण्यात सराफ व्यावसायिकाचा दुकानमालकावर गोळीबार

गोळीबाराची मालिका संपेना : पुण्यात सराफ व्यावसायिकाचा दुकानमालकावर गोळीबार

पुणे / बाणेर : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात शनिवारी सायंकाळी दहिसर येथे झालेल्या अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणासारखीच घटना घडली. आर्थिक कारणावरून सराफ व्यावसायिकाने आपल्या दुकानमालकावर बाणेर परिसरातील भरचौकात गोळीबार केला. त्यानंतर रिक्षातून पोलिस ठाण्यात जात असताना रिक्षामध्ये स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. दुकानमालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अनिल सखाराम ढमाले (वय 52, रा. बालेवाडी) असे आत्महत्या केलेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. आकाश गजानन जाधव (वय 39, रा. बाणेर) असे जखमी झालेल्या दुकानमालकाचे नाव आहे. ही घटना बाणेर येथील कळमकर पार्क लेनमध्ये शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल ढमाले हे सराफ व्यावसायिक आहेत. जाधव यांचे बाणेर येथील हाय स्ट्रीटवर दुकान आहे. जाधव यांनी ढमाले यांना 14 वर्षांपासून दुकान भाड्याने दिले आहे. अनिल ज्वेलर्स म्हणून हे दुकान ढमाले चालवत होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वाद सुरू होता. ढमाले याने जाधव यांना चहा घेण्यासाठी घरातून खाली बोलावले. घराजवळील कळमकर पार्क लेन नं.1 येथे ते दुचाकीवरून येत

असताना मागे बसलेल्या ढमाले याने जाधव यांच्या डोक्यात आपल्याकडील पिस्तुलातून गोळी झाडली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर ढमाले याने तेथून पळ काढला. त्याने एक रिक्षा केली व रिक्षाचालक सतीश यादव याला रिक्षा चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याकडे घेण्यास सांगितले. औंध येथील भाले चौकात रिक्षा आली असताना त्याने रिक्षाचालकाला मला पाणी घेऊन ये, असे सांगितले. यादव हे पाणी आणायला गेले. तेवढ्यात ढमाले याने स्वत:वर गोळीबार करून आत्महत्या केली. रिक्षामध्येच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. ढमाले याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे सुसाईड नोट मिळाली.

त्यात त्याने तीन महिन्यांपासून ढमाले याला जाधव आर्थिक कारणावरून त्रास देत होता. आता मला पर्याय नाही, म्हणून मी हा निर्णय घेत आहे, असे म्हटले आहे. ढमाले यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असून त्याच पिस्तुलाने त्याने गोळीबार करून स्वत:ही आत्महत्या केली आहे. दरम्यान आकाश जाधव यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. चतु:श्रृंगी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

अनिल ढमाले आणि आकाश जाधव हे एकमेकांच्या ओळखीचे होते. अनिल ढमाले हा आकाश जाधव यांचा भाडेकरू होता. दरम्यान आज सायंकाळी अनिल ढमाले हा आकाश जाधव याला चहा पिण्यासाठी घरून घेऊन गेला आणि औंधच्या भाले चौकात त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर स्वत: रिक्षात बसून जात असताना त्याने स्वतःवर गोळी मारून घेतली. आर्थिक कारणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

– बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चतुःशृगी पोलिस ठाणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news