Pune Crime News : वस्तार्‍याने गळा कापून एकाचा खून

file photo
file photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महिलेच्या पहिल्या पतीने, तिच्या दुसर्‍या पतीचा वस्तार्‍याने गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील मध्यवस्तीत असलेल्या बुधवार पेठेत घडला. नईम शेख असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून कलाम उर्फ रूबेल शेख याला पकडले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास क्रांती चौकाच्या बाजूला नवीन सागर इमारतीजवळ घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कलाम याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बुधवार पेठेत वास्तव्यास आहे.

कलाम शेख हा तिचा पहिला पती आहे. तर नईम शेख हा तिचा दुसरा पती आहे. सहा महिन्यांपूर्वी नईम याने महिलेसोबत लग्न केले आहे. तेव्हापासून ते एकत्र राहात होते. हा प्रकार कलाम याला समजला होता. कलाम हा सध्या फिरस्ता आहे. त्याला नईमबाबत राग होता. त्याच रागातून त्याने शुक्रवारी सायंकाळी वस्तार्‍याने नईमचा गळा चिरला. नईम लहान मुलाला घेऊन इमारतीच्या खाली फिरत होता. त्या वेळी कलाम हा तिथे आला.

काही वेळातच त्याने खिशातून वस्तरा काढून नईमच्या गळ्यावर फिरवला. जखमी नईमला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसरीकडे कलाम हा फरार झाला होता. तो रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्यावरून त्याला आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news