मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 60 वा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, शिंदे यांची महाराष्ट्राचे गतिशील आणि उद्योगशील मुख्यमंत्री म्हणून प्रशंसा केली. राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री, राजकीय नेते, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री बारानंतर ठाण्यातील घरी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. ठाण्यासह जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख दत्ता फासले यांच्या वतीने वाहनचालकांना एक लिटर पेट्रोल मोफत देण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांनी पंपावर लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

मुख्यमंत्री शिंदे यांनी किसननगर येथील शाखेत आपल्या वडील, पत्नी लता शिंदे, भाऊ, बालपणीचे सवंगडी आणि जुन्या कार्यकर्त्यांसह जन्मदिवस साजरा केला. टेभी नाक्यावरील आनंदाश्रमात जाऊन थेट गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्याठिकाणी आयोजित कार्यक्रमात गोरगरिबांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Back to top button