पुणे पोलिस भाजपचे कार्यकर्ते : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा आरोप | पुढारी

पुणे पोलिस भाजपचे कार्यकर्ते : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा आरोप

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आमच्यावर हल्ला होणार हे पुणे पोलिसांना माहिती होते. पोलिसांनी खबरदारी घेणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांनी चित्रपटातील पोलिसांसारखी भूमिका बजावली. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची भूमिका बजावली. रश्मी शुक्लासारख्या व्यक्तीला पोलिस महासंचालक केल्यानंतर दुसरे काय होणार, असा आरोप ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला.

जिवंत असेपर्यंत आम्ही मोदी शहांच्या झुंडशाही व गुंडशाही विरोधात लढत राहू. आम्हाला मारून टाकायचे असेल, तर मारून टाका, असेही वागळे म्हणाले. लोकशाही व संविधानाच्या बचावासाठी निर्भय बनो अभियानांतर्गत राज्यभर सभांचे सत्र सुरू आहे. या अभियानांतर्गत राष्ट्र सेवा दलातील निळू फुले सभागृहात शुक्रवारी निखिळ वागळे, ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी व विधिज्ञ असीम सरोदे यांची सभा झाली. या वेळी वागळे बोलत होते.

सभेपूर्वी झालेल्या गोंधळाचा आणि हल्ल्याचा समाचार घेताना वागळे म्हणाले, पोलिसांनी आम्हाला चार तास नजरकैदेत ठेवले. आमच्यावर हल्ला होणार आहे, हे माहिती असतानाही पुणे पोलिसांनी आमच्या गाडीला संरक्षण दिले नाही. या हल्ल्यास जेवढे भाजप कार्यकर्ते जबाबदार आहेत, तेवढेच पोलिसही जबाबदार आहेत. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत आम्ही लढू. पाच दिवसांत पाच गोळीबाराच्या घटना घडल्या. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश, बिहार झाला आहे. येणारी निवडणूक रक्तरंजीत होणार आहे. कुलगुरूला अडचणीत आणण्यासाठी ललित कला केंद्रावर हल्ला करण्यात आला. स्वसंरक्षणासाठी भगतसिंग ब्रिगेड काढावी लागेल. पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगाम्याच्या हाती जाऊ द्यायचा नाही, असेही वागळे म्हणाले.

चौधरी म्हणाले, आमच्यावर भाजपच्या गुंडांनी लाठ्या, काठ्या, अंडी आणि दगडाने हल्ला केला. सिन्नरमध्ये माझ्यावर भाजपच्या तालुकाध्यक्षांनी हल्ला केला. भाजपने त्यावर काहीही कारवाई केली नाही. पुण्यात मोठी सभा घेऊन भाजपच्या गुंडांना दाखवून देऊ आम्ही घाबरत नाही. विधानसभेच्या सर्व 288 मतदारसंघांत आम्ही जाणार आणि निर्भय बनो सभा घेणार आहोत.

‘गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा’

आमच्यावर झालेल्या हल्ल्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्पना नव्हती, या गोष्टीवर आमचा विश्वास बसत नाही. हा हल्ला त्यांच्या आदेशानुसारच झाला असेल. भाजपच्या गुंडांना आम्हाला ठार मारायचे होते. आम्ही गाडीचा ड्रायव्हर व राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांमुळे वाचलो. भाजपचे गुंड पोलिसांनाही मारत होते. या हल्ल्याप्रकरणी फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी वागळे, चौधरी व अ‍ॅड. सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा

Back to top button