लोकसभेची आचारसंहिता लागण्याआधी कोल्हापूरच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची बैठक

लोकसभेची आचारसंहिता लागण्याआधी कोल्हापूरच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची बैठक
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कोल्हापूर शहराच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी आणि क्रिडाई कोल्हापूरच्या सदस्यांची बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. क्रिडाईच्या वतीने आयोजित दालन 2024 चे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. त्यानंतर ते बोलत होते.

सामंत म्हणाले, कोल्हापूर क्रिडाईच्या सर्व मागण्या मार्गी लागल्या पाहिजेत, अशी आमचीही भूमिका आहे, कोल्हापूर शहराचा ऐतिहासिक वारसा, इथल्या निसर्गाचे संवर्धन, पंचगंगा नदीचे संरक्षण हे विषय मुख्यमंत्र्यांच्याही प्राधान्यक्रमाचे विषय आहेत. पंचगंगा नदीचा प्रश्न पुढची 50 वर्षे मार्गी लावण्यासाठी गाळ काढण्याच्या कामाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिले आहेत.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, क्रिडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजेंद्र यादव, क्रिडाईचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल, गौतम परमार, दालनचे चेअरमन चेतन वसा, अजय डोईजड, संदीप मिरजकर आदी यावेळी उपस्थित होते.

एकत्रित येऊन आयटी इन्फ्रास्ट्रक्चर उभारावे : सतेज पाटील

सतेज पाटील म्हणाले, शहरात 90 लाख स्क्वेअर फूट बांधकामाला परवानगी मिळाली असून 2030 पर्यंत 2 कोटी स्क्वेअर फूट बांधकाम होणार आहे. या बांधकामांना ग्राहक मिळण्यासाठी पॅरलल इकॉनॉमी उभी केली पाहिजे. आयटीसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर व्यावसायिक उद्योजकांनी एकत्र येऊन उभे केल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल.

के. पी. खोत म्हणाले, बांधकाम क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याची गरज आहे. 2007 रद्द झालेल्या यूएलसीतील फ्लॅटस् अद्यापही बिल्डरांकडे आहेत. ते मार्केटला विकण्यासाठी रेडीरेकनरप्रमाणे रक्कम सरकारला भरावी लागत आहे. त्यात सवलत मिळावी. कोल्हापूरच्या विकासासाठी कोकण रेल्वेला निधी द्यावा, कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा विषय मार्गी लावावा. बांधकाम क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी कामगार विभागाने प्रशिक्षण केंद्र सुरू करावे.

चार दिवस चालणार्‍या दालन 2024 मध्ये 168 स्टॉल्स असून त्यामध्ये 100 हून अधिक बांधकाम प्रकल्प, प्लॉटींग, बांधकामातील नवीन तंत्रज्ञान, पुरवठादार, वित्त पुरवठा करणार्‍या संस्था, विविध बँका यांच्या स्टॉल्सचा समावेश आहे. बाधकाम क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान एकाच छताखाली मिळवण्याची संधी दालनमध्ये उपलब्ध असल्याचे क्रिडाईचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news