आरटीआय कार्यकर्ता कदम खूनप्रकरणी दोघांना अटक | पुढारी

आरटीआय कार्यकर्ता कदम खूनप्रकरणी दोघांना अटक

कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा : सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम खूनप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री दोन संशयित युवकांना अटक केली आहे. महापालिकेत नोकरी लावण्यासाठी कदम याच्यासोबत संशयितांचा आर्थिक व्यवहार झाला होता. यातूनच कदम याचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. नीतेश दिलीप वराळे (वय 30) व सुरज प्रकाश जाधव (20, दोघे रा. सिद्धार्थ परिसर, सांगली) अशी समडोळी (ता. मिरज) येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तिसरा संशयित तुषार भिसे हा फरार असून त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

संतोष कदम (वय 36, रा. गावभाग, सांगली) याचा धारदार चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह एका मोटारीत आढळून आला होता. खून करून हल्लेखोर मोटार रस्त्यावर सोडून पसार झाले होते.

संशयित नीतेश वराळेला सांगली महापालिकेत नोकरीस लावण्यासाठी संतोष कदमशी आर्थिक व्यवहार झाला होता. पण नोकरीचे काम न झाल्याने वराळेने कदमकडे पैशाचा तगादा लावला होता. यातूनच 10 ते 12 दिवसांपूर्वी दोघांच्यात वाद झाला होता. कदमने गुरुवारी पैसे देण्याचा वायदा केला होता. पण पैसे न दिल्याने तिघांनी चाकूने वर्मी घाव घालून कदमची हत्या केली आणि वाहनासह मृतदेह नांदणी रस्त्यावर सोडून तिघांनी पलायन केले, असे पोलिस तपासात समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी काही घटना आणि सांगली जिल्ह्यातील काही संशयित निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Back to top button