बालसाहित्याचे दालन समृद्ध होणे गरजेचे : डॉ. राजा दीक्षित यांचे मत

बालसाहित्याचे दालन समृद्ध होणे गरजेचे : डॉ. राजा दीक्षित यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उद्याचा सक्षम वाचक घडविण्यासाठी आजच बालसाहित्याचे दालन अधिक समृद्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी म्हणून बालसाहित्यविषयक कार्य करणार्‍या संस्था आणि चळवळी कार्यरत राहिल्या पाहिजेत. कारण संस्थाच भरीव कार्य करीत असतात, असे मत राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी बुधवारी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन डॉ. राजा दीक्षित, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, बालसाहित्यिक राजीव तांबे, राजीव बर्वे व चंद्रकांत शेवाळे यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी डॉ. दीक्षित बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास वसेकर, सु. वा. जोशी, संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, दीपक पागे, घनश्याम देशमुख, निर्मला सारडा आदी उपस्थित होते. डॉ. दीक्षित यांनी बालसाहित्य चळवळ महानगरापुरती तसेच शहरी बालकांपर्यंत मर्यादित न राहता ती ग्रामीण आदिवासी मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे. ग्रामीण भागात बालसाहित्याची खरी गरज आहे, असे सांगितले. तांबे म्हणाले, बालसाहित्याबाबत घर, शाळा तसेच प्रशासकीय पातळीवर उदासीनता आहे. ही उदासीनता दूर करण्यासाठी पुस्तकांविषयी बोलले पाहिजे. बालक, पालक, शिक्षकांना सोबत घेवून चळवळ पुढे नेली पाहिजे.

पुनरुज्जीवन ही वाङ्मय क्षेत्रातील ऐतिहासिक गोष्ट

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पुनरुज्जीवन ही वाड्:मय क्षेत्रातील ऐतिहासिक गोष्ट आहे. ज्यांच्या खांद्यावर भवितव्य आहे. त्या बालकांसह कुमारांना सशक्त करणे काळाची गरज आहे. बालसाहित्य संस्थांना बालसाहित्याचे व्यासपीठ अग्निकुंडासारखे धगधगते ठेवावे लागणार आहे. प्रत्येक सोसायटीत ग्रंथालय आणि बाल दालन असले पाहिजे. या मागणीसाठी साहित्य संस्थांना चळवळ उभी करावी लागणार आहे, अशी अपेक्षा प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news