पाकिस्तान-तालिबानमधील संघर्ष झळा | पुढारी

पाकिस्तान-तालिबानमधील संघर्ष झळा

नरेंद्र क्षीरसागर, ज्येष्ठ विश्लेषक

अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आणण्यामध्ये मोलाची भूमिका पाकिस्तानने बजावली होती, ही बाब एव्हाना जगजाहीर झाली आहे. पाकिस्तानच्या अनेक वर्षांपासूनच्या रणनीतीचा तो एक भाग होता. असे असताना आता पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंधांमध्ये कटूता आली असून, हा संघर्ष विकोपाला जात आहे.

तालिबानसोबतच्या वाढत्या संघर्षामुळे गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये हिंसाचार वाढत आहे; पण या वाढत्या हिंसाचारास स्वतः पाकिस्तानच दोषी आहे. कारण, गेल्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानात हिंसाचार भडकावण्यामध्ये पाकिस्तानने सक्रिय योगदान दिलेले आहे. आता त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील तालिबान शासक यांच्यातील वाढता संघर्ष आणि हिंसाचार ही समकालीन इतिहासातील एक विलक्षण विडंबना आहे. भूतकाळाचा आढावा घेतल्यास, अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट प्रस्थापित करण्यात पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. किंबहुना, अफगाणिस्तानातून अमेरिकन फौजांना माघारी पाठवून तेथे तालिबानची सत्ता आणणे, हा मुद्दा पाकिस्तानच्या रणनीतीचा प्रदीर्घ काळ भाग राहिला आहे.

पाकिस्तानने अफगाणिस्तानातील तालिबान्यांना केवळ दहशतवादाचे प्रशिक्षणच दिले नाही, तर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही पुरवला. पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी आणि सैनिक यासाठी सक्रियपणाने कार्यरत होते. सप्टेंबर 1997 मध्ये अफगाणिस्तानमध्ये पहिले तालिबान सरकार स्थापन करण्यात पाकिस्तानला यश आले; पण त्यानंतर जेव्हा तालिबान सरकार आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढला, तेव्हा पाकिस्तानने 2001 मध्ये अमेरिकेच्या संमतीने मोठ्या संख्येने सैनिक आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स डायरेक्टोरेट जनरल ऑफ इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) तैनात केले.

संबंधित बातम्या

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली तालिबानविरुद्ध मोहिमेदरम्यान तेथे अनेक एजंट पाठवले. अमेरिकेला मदत करणे हा त्यामागचा त्यांचा जाहीर हेतू होता. त्या रणनीतीचा एक भाग म्हणून पाकिस्तानने नोव्हेंबर 2001 मध्ये तालिबान आणि अल कायदाच्या प्रमुख कमांडरना कुंदुझ येथून पाठवले. तथापि, पारंपरिक दुटप्पीपणाला अनुसरून वॉशिंग्टनला असेही सांगितले होते की, तालिबान आणि अल कायदाचे नेते आणि लढवय्येही नंतर तेथून बाहेर काढले जातील. पाकिस्तानच्या मदतीशिवाय तालिबान टिकू शकत नव्हते; पण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध सुरुवातीपासूनच चांगले नव्हते, हे यावरून लपवता येणार नाही. डिसेंबर 1979 मध्ये सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानात प्रवेश करून कब्जा केल्यानंतर पाकिस्तानने अमेरिकेच्या इशार्‍यावर मुजाहिद्दीनांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेईपर्यंत ही परिस्थिती कायम होती.

अमेरिकेच्या सूचनेनुसार पाकिस्तानने सोव्हिएतविरोधी आघाडीला पाठिंबा देणे सुरूच ठेवले; पण अमेरिकेवर 9-11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती बदलली. डिसेंबर 2001 मध्ये अफगाणिस्तानातून तालिबानला हुसकावून लावण्यासाठी अमेरिकेने कंबर कसली; पण तेव्हा पाकिस्तानने आपल्या देशात तालिबान नेत्यांचे पालनपोषण केले आणि त्यांना आपल्या प्रदेशात मुक्तपणे कारवाया करू दिल्या. यासोबतच त्यांनी तालिबानला आपल्या लष्कराचीही मदत दिली.

तालिबानी दहशतवाद्यांना सीमावर्ती भागात सुरक्षित आश्रयस्थान उपलब्ध करून दिले, जेथून ते मुक्तपणे अफगाणिस्तानात त्यांच्या कारवाया करू शकतील. हा झाला इतिहास; पण आता तालिबान आणि पाकिस्तान या दोघांमध्येच संघर्ष उफाळून आला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अलीकडेच अफगाणिस्तानवर कडाडून टीका करताना तालिबानला सज्जड इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ‘आम्ही अफगाणिस्तानला 50 वर्षे अन्न दिले; पण जर आमच्या मुलांचा प्रश्न असेल तर त्यांच्यावर हल्ला करणार्‍यांना आम्ही सोडणार नाही.’ अफगाणिस्तान हा असा शेजारी आहे ज्याने कधीही मैत्री राखली नाही.

सध्या दोन्ही देशांमधील संघर्षाचे मुख्य कारण म्हणजे ड्युरंड लाईन. ब्रिटिश मुत्सद्दी आणि नागरी सेवक सर मोर्टिमर दुरेड आणि अफगाणिस्तानचे अमीर अब्दुल रहमान खान यांनी 12 नोव्हेंबर, 1893 रोजी भारत आणि अफगाणिस्तानमधील अधिकृत सीमा म्हणून या सीमारेषेची व्याख्या केली. त्यावेळी पाकिस्तान हा भारताचा भाग होता; परंतु अब्दुल रहमान खानच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तानने ही कायदेशीर सीमा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला, कारण बहुतेक पश्तून, अफगाणिस्तानचा प्रभावशाली वांशिक गट पाकिस्तानच्या हद्दीत गेला. ही रेषा पूर्वेकडे सिंधू नदीच्या दिशेने वळवली जावी, अशी अफगाणिस्तानची इच्छा होती, जेणेकरून पाकिस्तानातील पश्तूनबहुल भाग आपल्या ताब्यात यावा आणि तोपर्यंत लोकांना मुक्त संचार करता यावा, या द़ृष्टिकोनातून त्यांनी पाकिस्तानातील पश्तून आणि बलूच वंशाच्या फुटीरतावादी सशस्त्र चळवळींना पाठिंबा दिला.

अलीकडच्या काळात टीटीपी अर्थात तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेकडून पाकिस्तानच्या लष्करावर जोरदार हल्ले होऊ लागले आहेत. गतवर्षी पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल इक कक्कर यांनी एका पत्रकार परिषदेत तालिबानवर तीव्र हल्ला चढवला आणि ते म्हणाले की, टीटीपीला तालिबानचे समर्थन असल्यामुळे पाकिस्तानात हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यापासून पाकिस्तानमधील हिंसाचारात आतापर्यंत 2,867 पाकिस्तानी मरण पावले आहेत.

Back to top button