ड्रग फ्री पुणे ऑपरेशन : ड्रग्ज तस्कर, पिस्तूलबाज रिंगणात! | पुढारी

ड्रग फ्री पुणे ऑपरेशन : ड्रग्ज तस्कर, पिस्तूलबाज रिंगणात!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील गुन्हेगारी टोळ्यातील टोळीप्रमुख आणि त्यांच्या पंटर लोकांना आयुक्तालयातील रिंगणात उभे केल्यानंतर दुसर्‍या दिवशीदेखील पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला. अमली पदार्थ विक्री आणि बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी मागील पाच वर्षांत गुन्हे दाखल असलेल्या 284 आरोपींची झाडाझडती घेतली. त्यामध्ये 38 महिलांचा समावेश असून, नायजेरीयन आणि इराणी अकरा महिला आहेत. अमली पदार्थ विक्री करणार्‍यांना कडक कारवाईचा इशारा देत पोलिस आयुक्तांनी ड्रग फ्री पुणे ऑपरेशनची सुरुवात केली.

उपायुक्तांच्या गुन्हेगारांना कडक सूचना

प्रत्येक पोलिस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींना घेऊन हजर होते. गुन्हे शाखेची सर्व पथके यावेळी उपस्थित होती. अमली पदार्थ विरोधी दोन्ही पथकांनी विक्री प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना आयुक्तालयात हजर केले होते. यावेळी पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी गुन्हेगारांना सूचना केल्या. सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर, पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईचा इशारा

शहरातील अमली पदार्थ तस्कर, तसेच बेकायदा जुगार अड्डे, मटका चालविणार्‍यांची अमली पदार्थ विरोधी पथक आणि सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकार्‍यांनी बुधवारी झाडाझडती घेतली. पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. त्याच पार्श्वभूमीवर अवैध धंदे करणार्‍यांना सूचना देण्यात आल्या. तसेच, अवैध धंदे सुरू दिसल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही दिला.

ड्रग फ्री पुणे हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय असणार आहे. सुरुवातीला रेकॉर्डवरील पेडलर आहेत, त्यांच्या हालचाली ओळखून पूर्णपणे रेकॉर्ड तयार करण्यात येत आहे. तसेच, जे अमली पदार्थांची नशा करतात त्यांची ठिकाणे शोधून काढली जातील. नाईट लाईफमध्ये जेथे अमली पदार्थांचा वापर होणारी ठिकाणे. अग्निशस्त्राच्या बाबतदेखील पोलिसांनी कंबर कसली आहे.

– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे.

हेही वाचा

Back to top button