

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानात मतदानाला एक दिवस उरलेला असताना बलुचिस्तानात एकापाठोपाठ दोन बॉम्बस्फोट झाले. पहिला स्फोट पाशिन शहरात झाला, त्यात 15 जण मरण पावले. 30 जखमी झाले. दुसरा स्फोट सैफुल्लाह शहरात झाला, त्यात 13 जण मरण पावले व 10 जण जखमी झाले. पाशिन शहरात अपक्ष उमेदवार असफंद यार खान काकर यांच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाला. यावेळी काकर कार्यालयात हजर नव्हते. मोटारसायकलमध्ये बॉम्ब पेरण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.
सैफुल्लाह शहरात जमियत-ए-उलेमा-ए-इस्लाम पक्षाचे उमेदवार मौलाना अब्दूल वासे यांच्या कार्यालयाबाहेर स्फोट झाला. दोन्ही स्फोटांत मिळून 28 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात 8 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका आहेत. सर्व प्रांतीय विधानसभांसाठीही मतदान आहे. बलुचिस्तानचे मुख्य सचिव तसेच पोलिसांना दोन्ही घटनांबाबतचा अहवाल पाठविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. बलुचिस्तानातील काळजीवाहू माहितीमंत्री अचकझाई यांनी सांगितले की, पहिल्या घटनेबाबत काही माहिती उपलब्ध झालेली आहे. दुसर्या घटनेचा तपासही सुरू आहे. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री अली मर्दान खान डोमकी यांनी हल्ल्यांचा निषेध केला आहे. दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
'बीएलए', 'पीटी'चे हल्ले वाढले
पाकमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) तसेच पाकिस्तान तालिबानच्या हल्ल्यांत वाढ झालेली आहे. बलुचिस्तानात 'बीएलए', तर खैबर पख्तुनख्वाँमध्ये पाकिस्तान तालिबान हल्ले चढवत आहे. बलुचिस्तान निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर स्फोटानंतर 5 फेब्रुवारी रोजी खैबर पख्तुनख्वाँमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला झाला होता. यात 10 पोलिस कर्मचारी मरण पावले होते. लगोलग खैबर पख्तुनख्वाँमध्येच इम्रान खान यांच्या अपक्ष उमेदवाराची हत्या झाली. अवामी नॅशनल पक्षाचे ज्येष्ठ नेते जहूर अहमद यांची हत्या झाली. बलुच आर्मीने माच शहरातील कारागृह व लष्करी तळावर 15 रॉकेट डागले होते.