मुदतीआधी उड्डाणपूल होणार खुला : राजाराम पूल ते फनटाईमपर्यंतचे काम सुरू | पुढारी

मुदतीआधी उड्डाणपूल होणार खुला : राजाराम पूल ते फनटाईमपर्यंतचे काम सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रोडवर राजाराम पूल ते फनटाईमपर्यंत उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून आत्तापर्यंत 63 टक्के काम पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी उड्डाणपुल सुरू होतो आणि उतरतो त्या ठिकाणी नियोजित मेट्रोचे पिलर्स उभे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचा कालावधी चार वर्षांचा असला तरी हे काम मुदतीअगोदरच म्हणजे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड रस्ता) रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल चौक ते फन टाईम थिएटर या दरम्यान अडीच किलो मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. या उड्डानपुलाचे काम 21 सप्टेंबर 2021 मध्ये सुरु करण्यात आले असून 71 पिलर्स आणि 106 गर्डर असलेल्या या उड्डानपुलाचे काम चार महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत आहे. आतापर्यंत गोयलगंगा चौक ते विठ्ठलवाडी चौक या दरम्यान पिलरचे काम पूर्ण झाले असून आता त्यावर गर्डर टाकण्याचे काम आनंद नगर ते विठ्ठलवाडी या दरम्यान सुरू आहे.

तसेच राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून दोन्ही बाजूंनी चढण्यासाठी व उतरण्यासाठी रॅम्पचे काम हाती घेण्यात आले आहे. उड्डानपुलाचे काम अपेक्षित गतिपेक्षा जास्त वेगाने सुरु असल्याने उड्डानपुलाने आत्तापर्यंत 63 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर 2025 पर्यंत उड्डानपुल नागरिकांसाठी खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

मेट्रो पिलरची उभारणी

सिंहगड रस्त्यावर खडकवासला ते हडपसर या मेट्रो मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. मेट्रोचे काम करताना उड्डाणपुलाचा रॅम्प फोडावा लागेल. ही अडचण पालिका व मेट्रोला लक्षात आल्यानंतर दोन्ही उड्डाणपुलांच्या चढणे व उतरण्याच्या ठिकाणी एकूण 39 मेट्रो पिलर येणार आहेत. त्यामुळे राजाराम पुल चौकातील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना 12 मेट्रो पिलर्स व विठ्ठलवाडी ते फनटाईम थिएटर या दरम्यान चार ठिकाणी 27 मेट्रो पिलर्स येणार आहेत. या पिलर्सचे काम हाती घेण्यात आले हे मेट्रोचे पिलर्स महामेट्रोच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली करण्यात येत आहेत.

हेही वाचा

Back to top button