अबब! 120 किलो वजन, पाच फुटांचे तांब्याचे भांडे | पुढारी

अबब! 120 किलो वजन, पाच फुटांचे तांब्याचे भांडे

नितीन पवार

कसबा पेठ (पुणे) : समृद्धी महामार्गावर सुशोभीकरणासाठी कोपरगावजवळ 120 किलो वजनाचे व 5 फूट उंचीचे तपेले (तांब्याचा हंडा) शिल्प म्हणून बसविले जाणार आहे. हे अवघड शिल्प साकारण्याचे काम तांबट आळी, कसबा पेठ येथील भांडी उत्पादन करणारे कारागीर 69 वर्षांचे सुभाष ऊर्फ बंडू महादेव पोटफोडे व त्यांचा मुलगा सुरेंद्र पोटफोडे या पिता-पुत्रांनी पेलले आहे.

या तपेल्याचे वजन जवळपास 120 किलो असून तपेले 5 फूट उंच तर 4 फुटांचा वरचा व्यास आहे. त्याचा तळाचा व्यास 6 फुटांचा आहे. हे तपेले बनविण्यासाठी आम्हाला 45 दिवस लागल्याचे सुरेंद्र पोटफोडे म्हणाले. अपचन, पित्त यावर औषधी गुणधर्म तांब्यातून मिळतात. तसेच तांब्याच्या भांड्यातून अन्न शिजवल्यावर चव चांगली लागते. त्यामुळे नागरिकांना तांब्याच्या या औषधी गुणधर्मामुळे तांब्याच्या भांड्यांची मागणी वाढली आहे.

गृहिणींची तांब्याच्या भांड्यांची मागणी वाढली

स्वयंपाकघरात रोजच्या वापरात येणारे तांबे, जग, पिंप, परात, मसाल्याचे डब्बे, पातेली, कढई, पेले, मटका तसेच वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा बनवून घेणे. तसेच दिवे, तामण, परडी, घंगाळी, लेम्प, घड्याळ, भातुकुलीची भांडी, शोपीस, गिफ्ट आर्टिकल आम्ही ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध प्रकारात आणि ग्राहकांना पाहिजे त्या आकारात व खिशाला परवडेल असे बनवून देत असतो, असे तांबट आळीतील भांडी उत्पादन करणार्‍या हर्षाली पोटफोडे यांनी सांगितले.

तांबट आळीची नवीन ओळख

सध्या दरआठवड्यामध्ये पुणे हेरिटेज, निरनिराळ्या संस्था, शाळा व महाविद्यालय यांचे विद्यार्थी तांबट आळी पाहण्यासाठी आवर्जून येतात. संस्थेतर्फे कालिकामाता मंदिरामध्ये त्यांना एक अर्धा तास इतिहासाची माहिती सांगण्यात येते. कारखान्यात सुरू असलेल्या तांबट कामाची ओळख करून दिली जाते. कातरकाम, भट्टी खोलकाम, झाळकाम, आकारकाम, उजळकाम, मठारकाम (आकर्षक ठोके मारणे), वेल्डिंग, पॉलिश व लॅकर, कल्हई कशा प्रकारे केली जाते, निरनिराळ्या महाविद्यालयातून इंटिरियर डेकोरेटर व आर्किटेक करणारी मुले नवीन प्रोजेक्ट म्हणून नवीन तांबट वस्तू प्रत्यक्ष बनवून त्यांचा प्रोजेक्ट सादर करतात, असे तांबट समाजाचे गिरीश पोटफोडे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button