Crime News : गळ्याला कोयता लावून लुटल्या बिअरच्या बाटल्या

file photo
file photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उधार दारू देण्यास नकार दिल्याच्या कारणातून तिघांनी थेट बिअर शॉपीमधील एकाच्या गळ्याला कोयता लावून हाताने मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांनतर त्याच्या साथीदारांनी शॉपीमधून दोन बियरच्या बाटल्या चोरून पळ काढल्याची घटना विश्रांतवाडी परिसरातील टिंगरेनगरमध्ये घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

स्वप्निल ऊर्फ सोप्या बालेकर (25), आकाश ऊर्फ बॉब (27), प्रकाश शिंदे (23) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील बालेकर आणि शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत शुभम अग्रवाल (18) याने फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि. 4) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे टिंगरेनगर भागात बिअर शॉपी आहे. आरोपी स्वप्निल आणि साथीदार नेहमी तिथे दारू आणण्यासाठी जात असत. रविवारी सायंकाळी फिर्यादी शुभम दुकानावर होता. त्या वेळी आरोपी स्वप्निल आणि साथीदार तेथे आले.

त्यांनी शुभमला उधारीवर दारूची मागणी केली. याला शुभमने विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या स्वप्निलने आपल्याकडील कोयता काढून शुभमच्या गळ्याला लावला. त्यानंतर साथीदारांनी जबरदस्तीने दोन बिअरच्या बाटल्या घेतल्या. आरोपींनी परिसरात कोयते फिरवून दहशत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर काही तासांत दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news