सक्षम पथदर्शी प्रकल्प : देहविक्री करणार्‍या महिलांचे पुनर्वसन

सक्षम पथदर्शी प्रकल्प : देहविक्री करणार्‍या महिलांचे पुनर्वसन

पुणे :  समाजात सर्वात दुर्लक्षित घटक असलेल्या देहविक्री करणार्‍या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून स्वबळावर ताठ मानेने उभे करण्यासाठी राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने पुढाकार घेतला आहे. या महिलांना उद्योग-व्यवसायाचे प्रशिक्षण, आर्थिक नियोजन याचे धडे देण्यासाठी ' ' या नावाने पथदर्शी प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली. पुण्यातील बुधवार पेठेत सुरू केलेला हा पथदर्शी प्रकल्प देशात अशा पद्धतीचा पहिलाच उपक्रम ठरला आहे. या यशस्वी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यातील अन्य शहरांतही करण्यात येईल.

या महिलांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी महिला व बालविकास आयुक्तालयामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. या महिलांना सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. त्यांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी मदत करण्याच्या जाणिवेतूनच महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी देह विक्री करणार्‍या महिलांचे संरक्षण व पुनर्वसन धोरण राबविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले.

आयुक्तालय स्तरावर एक समिती निर्माण केली. याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी आयुक्तांनी संबंधित अधिकारी यांची बैठक घेतली. त्यात ठरविल्यानुसार समितीने देहविक्री करणार्‍या महिलांना भेडसावणार्‍या समस्यांचा, त्यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी महिला व बालविकास विभागातील 20 कर्मचारी नियुक्तकेले. वस्तीतील महिलांची प्रश्नावली भरण्याच्या द़ृष्टीने या कर्मचार्‍यांनी जागेची पाहणी केली. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन, प्रश्नावली तयार करून त्यांच्यामार्फत बुधवार पेठेत देहविक्री व्यवसाय करणार्‍या 400 महिलांचा अभ्यास सुरू केला. बुधवार पेठेतील रहिवासी, दुकानदार, तेथे काम करणार्‍या सामाजिक संस्था तसेच पोलिस, महानगरपालिका, आरोग्य यंत्रणांचादेखील अभ्यास करण्यात येत आहे.

या महिलांना शासकीय कागदपत्र, ओळखपत्र काढता येत नाहीत तसेच आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिक फसवणूक केली जाते. बँक खाते नसल्यामुळे बचत होत नाही, उत्पन्नाची इतर साधने नाहीत. या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या. त्यानुसार सामाजिक संस्थांच्या मदतीने आधार कार्ड देण्यात आले. महिलांची बँकेत बचत खाती उघडण्यात आली. त्यांचा विमा काढून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे घेण्याची गरज असल्याने आरोग्य विभाग तसेच सामाजिक संस्थांसोबत चर्चा सुरू करण्यात आली आहे. या व्यवसायातून बाहेर पडू इच्छिणार्‍या महिलांना वित्त पुरवठा होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

समाजातील सर्वांत दुर्लक्षित असलेल्या देहविक्री करणार्‍या महिलांना सक्षम बनवीत समाजात ताठ मानेने उभे करण्यासाठी आम्ही धोेरण आखत आहोत. या महिलांच्या समस्यांचा आढावा घेताना, त्यांच्या गरजा काय आहेत, हे सुद्धा जाणून घेत आहोत. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी ठरला असून, त्याची अंमलबजावणी अन्य महानगरांतही करण्यात येईल.

– डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बालविकास विभाग

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news