उड्डाणपुलाचे काम सुरू, तरीही अतिक्रमण हटेना : रस्त्यावरच थाटले व्यवसाय | पुढारी

उड्डाणपुलाचे काम सुरू, तरीही अतिक्रमण हटेना : रस्त्यावरच थाटले व्यवसाय

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आल्याने वाहतुकीसाठी अरुंद रस्ता उपलब्ध आहे. त्यातच पदपथ सोडून मुख्य रस्त्याच्या कडेला फळे व भाजी विक्रेते आपला व्यवसाय थाटत असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडीत भर पडत आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावर विक्रेते व टेम्पोतून व्यवसाय करणार्‍यांचे अतिक्रमण वाढत असताना महापालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल चौक ते फन टाईम थिएटर या दरम्यान उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे.

मात्र, ज्या ठिकाणी उड्डाणपूलाचे काम सुरू आहे, त्याच ठिकाणी अरुंद रस्त्यावर दुकानदारांच्या आणि ग्राहकांची दुचाकी व चारचाकी वाहने दिवसभार पार्किंग केली जातात. त्यातच पदपथांवर फळे व भाज्या विक्रेते बसत असल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. दुसरीकडे गणेश मळा ते राजाराम पुल चौकापर्यंत पदपथाचे सुशोभीकरण करून पदपथाची रुंदी वाढवण्यात आली आहे. मात्र, फळे, भाजी आणि विविध वस्तूंची विक्री करणारे पदपथ सोडून मुख्य रस्त्याच्याकडेलाच बसतात. या ठिकाणी वहानचालक रस्त्यालाच वाहने उभी करून खरेदी करतात, त्यामुळे ररस्त्यावर वाहतुककोंडी होते.

पु. लं. देशपांडे उद्यानाच्या प्रवेशद्वारावर अतिक्रमण

महापालिकेने सिंहगड रस्त्याच्या परिसरात पु.लं. देशपांडे उद्यान साकारले आहे. या ठिकाणी नागरिक आपल्या मुलांना घेवून येतात. मात्र, या उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच भेळ, पाणीपुरी आणि विविध वस्तू विकणार्‍यांचे स्टॉल लावले जातात. त्यामुळे उद्यानात ये जा करणार्‍यांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो.

रस्त्याच्या कडेलाच पार्किंग

सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने पदपथ लहान करून रस्त्याची रुंदी वाढवण्यात आली आहे. आनंदनगर ते विठ्ठलवाडी या दरम्यान कामासाठी रस्त्यावर बॅरेकेटींग करण्यात आले आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होत असताना याच रस्त्यावर मॉलमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक व वेगवेगळे व्यवसायिक आपल्या चारचाकी गाड्या रस्त्याच्याच कडेला पार्किंग करतात. त्यामुळे वाहतुकीसाठी केवळ एक किंवा दीड लेन उपलब्ध होते. या रस्त्यावर दुचाकी गाड्यांवर कारवाईसाठी फिरणार्‍या वाहतूक पोलिस या चारचाकी गाड्याकडे मात्र, सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.

हेही वाचा

Back to top button