खा. शरद पवार यांची तोफ मंचरला धडाडणार ! | पुढारी

खा. शरद पवार यांची तोफ मंचरला धडाडणार !

मंचर : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांचे जवळचे, विश्वासू सहकारी, शिष्य आणि सध्या अजित पवार यांच्या गटात असणारे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पवार यांची 21 फेब्रुवारीस सभा असून या सभेत ते वळसे पाटील यांच्यावर काय तोफ डागणार याची चर्चा आतापासूनच होऊ लागली आहे. शरद पवार हे मंचरला सभा घेणार अशी चर्चा तीन महिन्यांपासून सुरू होती. आता या सभेचा मंचर मुहूर्त ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने शरद पवार यांना सोडून मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देण्याचे ठरवले. मंत्रिमंडळात वळसे पाटील यांनी सहभाग घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली.

शरद पवार यांना दैवत मानणारे दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली यावर मागील दोन-तीन महिने राजकीय मंथन झाले. एवढ्या घडामोडीनंतर मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ का सोडली, याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्यांच्याविरोधात कोणताही शब्द वापरला नाही. माझे दैवत शरद पवार असल्याचे ते आजही सांगतात.
वळसे पाटील हे आपणास सोडून गेल्याचे प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना विचारले असता, मी त्यांच्या मतदारसंघात सभा घेऊनच त्यावर भाष्य करणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले होते.

मात्र शरद पवार यांची सभा घेण्यासाठी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी मागणी करूनही तारीख दिली जात नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ म वाढत होता.
अखेर शरद पवार यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मंचर येथे 21 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता जाहीर सभा घेण्याचे मान्य केल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.

शरद पवारांमुळे ताकद मिळाल्याचे नेहमीच वक्तव्य

दिलीप वळसे पाटील यांनी अनेकवेळा शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळेच आपल्या मतदारसंघाला ताकद मिळाली आहे. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास केल्याचे सांगितले आहे. अजित पवार यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर मंचर येथे झालेल्या सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते की, शरद पवार जर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येणार असतील तर कार्यकर्त्यांनी स्वागत केले पाहिजे, त्यांची सभा ऐकण्यासाठी गेले पाहिजे.

तब्बल पाच वर्षांनंतर होणार सभा

शरद पवार यांची गेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी म्हणजे जवळपास पाच वर्षांपूर्वी जाहीर सभा झाली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर शरद पवार आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय सभा घेणार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी अर्थात आंबेगावचे आ. दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे प्रतिनिधी आ. अतुल बेनके आणि खेडचे प्रतिनिधी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याबाबत शरद पवार काय बोलणार याबाबत उत्कंठा वाढीस लागली आहे.

हेही वाचा

 

Back to top button