महुडेतील जिरायती क्षेत्र बारमाही बागायती होणार : आ. संग्राम थोपटे | पुढारी

महुडेतील जिरायती क्षेत्र बारमाही बागायती होणार : आ. संग्राम थोपटे

भोर : पुढारी वृत्तसेवा : निरा देवघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रापासून होणार्‍या बंदिस्त पाईप लाईन डावा कालव्यामुळे महुडे खोर्‍यातील सुमारे बाराशे हेक्टर जिरायती शेती बारमाही ओलिताखाली येणार आहे. सतरा गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले. निरा देवघर धरणाच्या बंदिस्त डावा कालव्यास 28 कोटी 47 लाख 58 हजार रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचे भूमिपूजन आ. संग्राम थोपटे यांच्या हस्ते महुडे (ता. भोर) येथे करण्यात आले, या वेळी ते बोलत होते.

या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, माजी सभापती बाळासाहेब थोपटे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, उपाध्यक्ष अतुल शेडगे, सुरेश राजीवडे, प्रवीण शिंदे, अंकुश खंडाळे, शिंदचे सरपंच शंकर माने, उपसरपंच अमर शेडगे, महुडे खुर्दचे सरपंच सोनाली कुमकर, भोलावडे विकास सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत चंदनशिव, कालवा समितीचे अध्यक्ष बबनराव खाटपे, जलसंपदा अधिकारी डी. एस. भावेकर आदींसह ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. संग्राम थोपटे म्हणाले, मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा करून योजनेला निधी मंजूर करून घेतला. यामुळे म्हसर खुर्द, म्हसर बुद्रुक, गोळेवाडी, कंकवाडी, आपटी, नांदगाव, वाठार हिमा, पिसावरे, महुडे खुर्द, महुडे बुद्रुक, ब्राह्मणघर, खालचे नांद, वरचे नांद, गवडी, शिंद, किवत, भोलावडे, सांगवी, येवली या गावातील शेतकर्‍यांची बाराशे हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे.

निरा देवघर व भाटघर धरणातून दुष्काळाच्या नावाखाली सर्रास सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. परंतु, भोर तालुक्यातील काही मंडले शासनाने दुष्काळाच्या यादीत समाविष्ट आहेत. जर धरणातील पाणी पातळी झपाट्याने खाली गेली तर येणार्‍या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते. कोणाच्या तरी दबावाखाली राहून पाणी सोडले जाते. प्रशासनावर वेगळा दबाव आणला जात आहे, असे संग्राम थोपटे यांनी सांगितले.टीटेघर, कोर्ले, वडतुंबी या उपसा सिंचन योजनेची चाचणी पूर्ण झाली आहे. लवकरच ही योजना सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

विरोधकांवर टीका

काही मंडळी जिल्हा नियोजनची मंजूर झालेली विकासकामे आम्ही केल्याचा आव आणत श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका संग्राम थोपटे यांनी विरोधकांवर केली.

हेही वाचा

Back to top button