राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार सुनील शेळके | पुढारी

राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार सुनील शेळके

वडगाव मावळ : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रभारी म्हणून आमदार सुनील शेळके यांची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्ती केली आहे. राज्यातील युवक संघटन मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी नुकतीच आमदार शेळके यांची नियुक्तीपत्र देऊन निवड जाहीर केली आहे. आमदार शेळके यांनी चार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

त्यानंतर आमदार झाल्यावर गेल्या चार वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आणून मावळचा विकास गतिमान केला. त्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू आमदार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आता आमदार शेळके यांच्यावर युवक संघटनेच्या प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी देऊन राज्यात पक्षाची युवक संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने व आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील सर्व स्तरातील युवक आकर्षित होतील, असे उपक्रम व नावीन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात, असेही प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी सूचित केले आहे.

भेगडें पाठोपाठ शेळकेंवर राज्याची जबाबदारी

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली असून, त्यांच्या पाठोपाठ आता युवक संघटनेच्या प्रदेश प्रभारी म्हणून आमदार शेळके यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील दोन कार्यक्षम नेत्यांना राज्याच्या संघटनेत स्थान दिले असल्याने उपमुख्यमंत्री पवार व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे मावळ तालुक्यावर विशेष लक्ष असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा

Back to top button