पिंपळे गुरव येथील पदपथ कधी मोकळा श्वास घेणार? | पुढारी

पिंपळे गुरव येथील पदपथ कधी मोकळा श्वास घेणार?

पिंपळे गुरव : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गत संपूर्ण शहरामध्ये मोठमोठे पदपथ निर्माण केले आहेत. परंतु, दुर्दैवाने सर्वसामान्यांना पदपथावरून चालण्याकरिता जागा उपलब्ध नाही. पिंपळे गुरव परिसरातील पदपथ हे अनधिकृत भाजी, फळ विक्रेते व अनेक व्यावसायिकांनी गिळंकृत केलेले दिसत आहेत.

नागरिकांना नाहक त्रास

अनेक वेळा अतिक्रमण विभागाकडून संबंधितांवर कारवाई केली जाते. परंतु, पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. सध्या दुकानदार आणि पथारीवाल्यांनी पदपथ गिळंकृत केल्याचे चित्र नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात दिसत आहे. परिसरात पथारीवाल्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अपघाताची भीती

नवी सांगवीतील फेमस चौक, शिवनेरी चौक, एम. के. हॉटेल परिसरात पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने नागरिकांना मुख्य रस्त्यावरुन चालत जावे लागत आहे. अशा वेळी पादचार्‍यांना वाहतूककोंडीतून वाट काढावी लागत आहे. तसेच, यामुळे अपघाताचीही भीती व्यक्त केली जात आहे.

वाहतूककोंडीत वाढ

सकाळीपासून संध्याकाळपर्यंत पदपथावर अनेक पथारीवाले व्यवसाय करतात. संध्याकाळी अनेकजण कामावरुन घरी जात असतात. त्यातच नागरिक पदपथावरील व्यावसायिकांकडून वस्तूंची खरेदी करत असतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी परिसरात वाहतूककोंडी ही नित्याची झाली आहे. अनेक पथारीवाले हे भोंगे लावून आपल्या मालाची विक्री करत असतात. त्यामुळे नागरिकांना ध्वनी प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा

Back to top button