निवडणूक आल्यावर जनसेवक असल्याचा अभिनय मी करीत नाही : शिवाजीराव आढळराव पाटील | पुढारी

निवडणूक आल्यावर जनसेवक असल्याचा अभिनय मी करीत नाही : शिवाजीराव आढळराव पाटील

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा :  डॉक्टर असताना कोरोना काळात त्यांनी लोकांपासून दूर राहणे पसंत केले. मी पदावर नसताना अहोरात्र जनतेत आहे. निवडणुका आल्या म्हणून जनसेवेचा अभिनय मी करीत नाही, अशी टीका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता केली. वाळद (ता. खेड) येथे 2 कोटी 5 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 31) करण्यात आले. या वेळी आयोजित स्वागत समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आढळराव पाटील बोलत होते.

चार वर्षे गायब होतात आणि संसदरत्न मिळाले म्हणून सांगायला येतात. ऐतिहासिक वारसा सांगून असे खोटे बोलणार्‍यांचा हिशेब जनतेने ठेवावा, असा सल्लाही आढळराव पाटील यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर मतदारसंघात काम करताना एक हजार कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावली असल्याचा उल्लेख आढळराव पाटील यांनी केला. तत्पूर्वी, राजगुरुनगर येथे शासकीय योजनांचा शुभारंभ आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. खेड पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर बुरसेवाडी, वाळद, साकुर्डी, कहुकोयाळी, हेदृज, विरहाम, वडगाव पाटोळे येथे आढळराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. ’खासदार आपल्या दारी’ उपक्रमातंर्गत आयोजित केलेल्या या दौर्‍याला गावोगावच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि खेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, नितीन गोरे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय शिंदे, पंचायत समितीच्या माजी उपसभापती ज्योती अरगडे, माजी सदस्या शकुंतला पोखरकर, धनंजय पठारे, मारुती सातकर, वाशेरेचे सरपंच संभाजी कुडेकर, नैना झनकर, आरती कांबळे, धनंजय फडके, सपना गाडगे, वाळदचे सरपंच मनोहर पोखरकर, उपसरपंच विक्रम पोखरकर, सदस्य नितीन वाळुंज व सहकारी महिला सदस्य, जालिंदर पोखरकर, अंबर सावंत, संभाजी पोखरकर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button