पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ‘एमपीडीए’चे शतक | पुढारी

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ‘एमपीडीए’चे शतक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का, एमपीडीए या कायद्यांचा कठोरपणे वापर करीत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. केवळ एक वर्षाच्या कालावधीत मोक्का कारवाईची शंभरी पार केल्यानंतर आता, एमपीडीए कायद्यांतर्गत 100 गुन्हेगारांवर कारवाई करून राज्यातील विविध कारागृहांत त्यांना स्थानबद्ध केले आहे. राजू हनुमंत गायकवाड (वय 39, रा. गंगानगर, हडपसर) या हडपसर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यातर्गंत 100 वी कारवाई करण्यात आली आहे.

राजू गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून, हडपसर परिसरात त्यांच्यावर मागील 4 वर्षांमध्ये 7 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके व पीसीबी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस उपनिरीक्षक राजू बहिरट, शेखर कोळी, सहायक उपनिरीक्षक दिलीप झानपुरे, अंमलदार योगीराज घाटगे, अविनाश सावंत, संतोष कुचेकर, सागर बाबरे, अनिल भोंग यांनी राजू गायकवाड यांच्या गुन्ह्यांची सर्व माहिती एकत्रित करून एमपीडीए अन्वये प्रस्ताव तयार केला.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून राजू गायकवाड याला एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. एमपीडीए बरोबरच 114 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. दहशत निर्माण करणारे व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम पीडीए कायद्यान्वये इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याचे पुणे पोलिस आयुक्तालयाचे इतिहासामध्ये प्रथमच झाली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button