Pudhari Health : निरोगी जीवनासाठी पाण्याचे योगदान | पुढारी

Pudhari Health : निरोगी जीवनासाठी पाण्याचे योगदान

डॉ. भारत लुणावत

पाण्याला जीवन म्हणतात इतके ते आपल्याशी निगडीत आहे. कोणताही जीव पाण्याशिवाय राहू शकत नाही. माणसाच्या अनेक सवयी असतात. कुणी जास्त पाणी पिते, तर कुणी कमी. मुळात पाणी पिणे ही बाब आपल्याला फारशी महत्त्वाची वाटत नाही. तहान लागली की पाणी पितो, एवढेच पाण्याचे महत्त्व आपण जाणतो. पाणी जीवनावश्यक घटक आहे वगैरे पुस्तकी ज्ञान आपल्याला असते; पण ते तेवढेच. याउपर आपण पाण्याचा विचार करत नाही. आरोग्याच्या दृष्टीने पाणी किती महत्त्वाचे आहे, हा विचार तर दूरच राहिला. शिवाय पाण्यामुळे शरीर निरोगी आणि स्वच्छ तर राहतेच, त्याचबरोबर आपल्याला उत्साहीही ठेवते. अधिक पाणी पिण्याचे काय फायदे होतात, ते आपण पाहू. (Pudhari Health)

1. वजनवाढ रोखते

जास्त पाणी पिण्यामुळे शरीर फुगते, ही समजूत चुकीची आहे. उलट जास्त पाणी प्याल्याने तुम्ही कमी खाता आणि तरीही तुमचे पोट भरते. तुमचा आहार जास्त असेल आणि त्यामुळे तुमचे वजन वाढत असेल, तर आहारावर नियंत्रण ठेवण्याचा हा चांगला उपाय आहे. अधिक पाणी पिण्याचा तुम्हाला फायदा होईल. (Pudhari Health)

2. शरीर स्वच्छ करते

सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पाणी पिण्याने मोठ्या आतड्यात तयार झालेले अनेक घातक घटक बाहेर पडतात. थोडक्यात, तुमचे मोठे आतडे तुम्ही दिवसभरात खाणार असलेल्या अन्नातील पोषक घटक स्वीकारायला तयार राहते.

3. नव्या पेशी तयार होतात

आपल्या शरीरात रोज नव्या पेशी तयार होतात आणि अधिक पाणी पिण्यामुळे या नव्या पेशींच्या निर्मितीला मदत मिळते. यामुळे स्नायूंची वाढ चांगली होते आणि व्यायामानंतर त्यांना चांगला आकारही मिळतो.

4. चयापचय क्रिया सुधारते

पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील एक महत्त्वाचा फायदा म्हणजे चयापचय क्रिया (मेटॅबॉलीझम) सुधारते. रोज सकाळी दोन भांडी पाण्या प्या आणि दिवसातील वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यायला तुम्ही तयार होता की नाही, ते पाहा!

5. डोकेदुखी आणि संसर्गापासून बचाव करते

तुम्ही आजारी असताना शरीरात पाणी असणे अत्यावश्यक असते. पाण्यामुळे विविध संसर्गांपासून तुमचा बचाव होतो शिवाय तुम्हाला लवकर बरे करण्यात पाणी मोलाची मदत करते. डीहायड्रेशनमुळे जेव्हा तुमचे डोके दुखायला लागते, तेव्हा पाणी हा त्यावरचा उपचार ठरतो. म्हणूनच तुम्हाला जेव्हा केव्हा अस्वस्थ वाटू लागेल तेव्हा कोणत्याही औषधाच्या गोळ्या घेण्यापेक्षा आधी भांडेभर पाणी प्या!

हेही वाचा :

Back to top button