दिव्यांगांसाठी हवे स्वतंत्र विद्यापीठ : नसिमा हुरजूक | पुढारी

दिव्यांगांसाठी हवे स्वतंत्र विद्यापीठ : नसिमा हुरजूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिव्यांगांच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबविल्या जातात; परंतु अंमलबजावणी करताना काही अपवाद सोडला, तर कागदावरची योजना प्रत्यक्षात राबवली जात नाही. त्यामुळे शिक्षणामध्ये सर्वसमावेशकता आणण्यासाठी दिव्यांगांच्या विशेष शाळा आणि महाविद्यालयात दिव्यांगांसोबत काही प्रमाणात सर्वसामान्य विद्यार्थीदेखील असले पाहिजेत तसेच दिव्यांगांच्या उन्नतीसाठी स्वतंत्र विद्यापीठाची नितांत गरज असल्याचे मत दिव्यांग चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या व दिव्यांग विद्यापीठ निर्मितीसाठीच्या समन्वय समितीच्या सदस्य नसिमा हुरजूक यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधी सेवा संघ संचलित पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या सल्ला व मार्गदर्शन विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या दिव्यांग विद्यापीठ निर्मिती याविषयीच्या राज्यस्तरीय ऑनलाईन चर्चासत्रात हुरजूक बोलत होत्या. यावेळी दिव्यांग विद्यापीठ निर्मिती समन्वय समितीचे अध्यक्ष माजी कुलगुरु मुरलीधर चांदेकर,समिती सदस्य वर्षा गट्टू, विजय कान्हेकर, डॉ.संदीप तांबे, निलेश छडविलकर,सुहास तेंडुलकर,डॉ.कल्याणी मांडके, डॉ.स्वाती सदाकळे, अ‍ॅड कविता पवार, धनंजय भोळे, सुहास कर्णिक यांच्यासह दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात कार्यरत संस्था-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दृष्टिहिन दिव्यांग धनंजय भोळे म्हणाले, राज्यातील प्रचलित कोणत्याही विद्यापीठाचे संकेतस्थळ तसेच पूर्ण परिसर दिव्यांगांसाठी सुलभ नाही. अभ्यासक्रमाचे साहित्य दिव्यांगांच्या विशेष गरजेनुसार उपलब्ध झाले पाहिजे. डॉ.कल्याणी मांडके म्हणाल्या, दिव्यांगांच्या स्वतंत्र विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी संख्या तसेच प्रचलित विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे सर्वसमावेशक विचार केला पाहिजे.

दिव्यांग जागृती कट्टा या ऑनलाइन चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी झूम तसेच यू ट्यूबची लिंक देण्यात आली होती. यासाठी तांत्रिक साहाय्य महात्मा गांधी संघांचे समन्वयक सागर कान्हेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर यांनी तर सूत्रसंचालन दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन विभागाचे समुपदेशक हरिदास शिंदे यांनी केले.

कोणत्या सुविधा हव्यात?

  •  दिव्यांगांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन सर्व परिसर अडथळामुक्त असावा तसेच साहाय्यक साधने सहज उपलब्ध असावीत
  •  ब्रेल भाषेतील साहित्याची उपलब्धता तसेच ऑडिओ ग्रंथालयनिर्मिती
  •  कर्णबधिर दिव्यांगांसाठी सांकेतिक भाषेच्या दुभाषकांची गरज
  •  दिव्यांगांच्या अधिकाराचा अभ्यासक्रमात समावेश
  •  विद्यापीठ परिसरात सुविधायुक्त वसतिगृहाची उभारणी

हेही वाचा

Back to top button