Pune News : घाण करणार्‍यांवर आता कारवाईसाठी भरारी पथक | पुढारी

Pune News : घाण करणार्‍यांवर आता कारवाईसाठी भरारी पथक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी घाण करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने भरारी पथके तयार केली आहेत. या पथकांकडून प्रभावीपणे कारवाई होण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने 4 स्पेशल स्क्वॉड व्हेईकलची खरेदी केली आहे. या गाड्यांचे लोकार्पण बुधवारी महापालिका आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, लघुशंका करणे, थुंकणे, कचर्‍याचे वर्गीकरण न करणे, कचरा जाळणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, ओला कचरा जिरवण्यासाठी बल्क वेस्ट यंत्रणा कार्यान्वित न ठेवणे आदींवर दंडात्मक कारवाई केली जाते.

ही कारवाईची जबाबदारी ही क्षेत्रीय कार्याालय, संबंधित आरोग्य निरीक्षकांच्या माध्यमातून केली जात आहे. विविध कारवाई करण्यासाठी दैनंदिन स्थळांची पाहणी करणे आवश्यक आहे. कारवाई प्रभावीरीत्या व्हावी, यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास एक व मुख्य खात्यास तीन, अशी एकूण 18 वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात आलेल्या चार वाहनांचे वितरण महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, मोटार वाहन विभागाचे उपायुक्त जयंत भोसेकर, उप आयुक्त प्रसाद काटकर, महापालिकेचे सहायक आयुक्त, सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम म्हणाले, दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पहिल्या टप्यात 4, दुसर्‍या टप्यात 14 अशा एकूण 18 स्पेशल स्क्वॉड व्हेईकल खरेदी करण्यात येत आहेत. पहिल्या टप्यातील 4 गाड्यांचे वितरण आज करण्यात आले. या गाड्या दंडात्मक कारवाई प्रभावीपणे करणार्‍या 4 क्षेत्रीय कार्यालय म्हणजे हडपसर-मुंडवा क्षेत्रीय कार्यालय, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय, नगर रोड- वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय आणि प्लास्टिक स्क्वॉड मुख्य मनपा भवन कार्यालय यांना देण्यात आल्या आहेत. दुसर्‍या टप्प्यातील उर्वरित 14 गाड्यांचे वितरण क्षेत्रीय कार्यालयांना करण्यात येईल.

हेही वाचा

Back to top button