राम मंदिराचा उपयोग राजकारणासाठी : काँग्रेस प्रभारी रमेश चेंनिथला | पुढारी

राम मंदिराचा उपयोग राजकारणासाठी : काँग्रेस प्रभारी रमेश चेंनिथला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सामाजिक एकता मोडीत काढून दुही निर्माण करण्याचे काम करीत असून, ते आपल्या पंतप्रधानपदाचा गैरवापर करीत आहेत. पंतप्रधान आणि भाजपकडून राम मंदिराचा उपयोग भक्ती आणि श्रद्धेसाठी नाही, तर राजकारणासाठी करण्यात आला. पंतप्रधानांनी राम मंदिराच्या सोहळ्यात राजकीय भाषण केले, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेंनिथला यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये मंगळवारी चेंनिथला यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक झाली. बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत चेंनिथला बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान, आशिष दुआ, सोनम पटेल, विश्वजित कदम, रमेश बागवे, रवींद्र धंगेकर, संजय जगताप, मोहन जोशी, अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

चेंनिथला म्हणाले, काँग्रेस ही संविधानावर चालणारी धर्मनिरपेक्ष संघटना आहे. ज्याला त्याला त्याच्या धर्मानुसार पूजाअर्चा करायला आम्ही विरोध करीत नाही. परंतु, पंतप्रधान धर्माचा दुरुपयोग करून समाजात दुफळी निर्माण करीत आहेत, याचे दुःख होते. त्यांनी अयोध्येतील कार्यक्रमापासून शंकराचार्यांना दूर ठेवले. एवढेच नव्हे तर अयोध्येच्या पवित्र मंचावरून त्यांनी निवडणुकीचे राजकीय भाषण दिले. मोदी राम मंदिराचा मुद्दा राजकारणासाठी वापरत आहेत, हे जनतेला देखील समजू लागले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मंदिरात जाण्यापासून रोखले. गांधींच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते पाठविले, ही भाजपची खरी संस्कृती असून, जनता मतदानातून भाजपला धडा शिकवेल. भाजप पक्ष सक्षम नाही म्हणून ते नेत्यांच्या प्रवेशाच्या अफवा पसरवत आहेत. जे भाजपमध्ये जात आहेत ते पदासाठी जात आहेत. त्यांना विचारधारेशी काहीही घेणे नाही. विचारधारा असणारे कोणीही पक्षांतर करणार नाही, असा विश्वास चेंनिथला यांनी या वेळी व्यक्त केला.

आघाडीतील जागा वाटप आठवडाभरात जाहीर करणार
राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी जागा वाटप चर्चेची पहिली फेरी झाली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी वंचित आघाडीसह मित्रपक्षांचे महाविकास आघाडीत स्वागत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करीत आहेत. आंबेडकरांना आघाडीत घेण्यास आमचा कसलाही विरोध नाही. लवकरच सर्व मित्रपक्ष एकत्र चर्चा करून आठवडाभरात जागा वाटप जाहीर करू, असे चेंनिथला यांनी स्पष्ट केले.

Back to top button