मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे सर्व्हर डाऊन

मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे सर्व्हर डाऊन
पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या नियोजनानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला मंगळवारी (दि. 23) सुरुवात झाली. मात्र, सर्वेक्षण सुरू होताच दुपारी बारा वाजल्यापासून सर्व्हर डाऊन झाले. परिणामी, सर्वेक्षणाचे काम संथगतीने सुरू होते. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने राज्यात सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटकडील प्रशिक्षकांमार्फत (मास्टर ट्रेनर) प्रशिक्षण देण्यात आले. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे दहा हजार प्रगणकांमार्फत बुधवारी सकाळी प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात सॉफ्टवेअर चांगले चालत होते. मात्र, दुपारी बाराच्या सुमारास राज्यभरात एकाचवेळी सॉफ्टवेअर वापरात आल्याने सर्व्हर डाऊन झाल्याचे कामात व्यत्यय आला.
सर्वेक्षणाचे काम 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचे उद्दिष्ट असून, त्यासाठी ग्रामीण भागात तालुकास्तरावर 15 नोडल अधिकारी, 15 सहायक नोडल अधिकारी, 466 पर्यवेक्षक व 6 हजार 596 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  तर पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात सुमारे साडेतीन हजार प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली. बुधवारी प्रत्यक्षात सर्वेक्षणासाठी प्रगणकांनी काम सुरू केले. मात्र, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अनेक प्रगणकांचे मोबाईल चालत नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या.
यासंदर्भात त्याची माहिती मागासवर्ग आयोगाला देण्यात आली. त्यानुसार सर्व्हरमध्ये सुधारणा केली जात असल्याचे कळविण्यात आले.
मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचा आजचा पहिला दिवस होता. एकाचवेळी सॉफ्टवेअर वापरात आले. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम संथ झाले.
                                                                                – ज्योती कदम,  निवासी उपजिल्हाधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news