आरक्षणाच्या सर्वेक्षणाचा पहिल्याच दिवशी बोजवारा

आरक्षणाच्या सर्वेक्षणाचा पहिल्याच दिवशी बोजवारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार हाती घेतलेल्या सर्वेक्षणाचा मंगळवारी (दि.23) पहिल्याच दिवसी बोजवारा उडाला. सर्व्हर डाऊन झाल्याने दुपारी तीन वाजल्यानंतर सर्वेक्षणाचे काम थांबले. सर्वेक्षण करणार्‍या कर्मचार्‍यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळाले नाही, त्यामुळे अनेकांना तांत्रिक गोष्टींचा सामना करावा लागला. तर अनेकांना केवळ परिसराची पाहणी करून परतावे लागले. राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत करण्यात येणार्‍या या सर्वेक्षणाची सुरूवात मंगळवारी झाली.

सर्वेक्षणासाठी ऑनलाईन अ‍ॅपचा वापर करण्यात येत आहे. प्रगणक व अधिकार्‍यांना अ‍ॅप वापराबाबत तसेच सर्वेक्षणाबाबत प्रशिक्षणही देण्यात आले. सर्वेक्षणासाठी महापालिकेने दोन हजार पाच प्रगणकांची नेमणूक केली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सकाळी सर्वप्रथम पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये सर्वेक्षण सुरू झाले. यानंतर राज्यातील अन्य भागात सर्वेक्षण सुरू होऊन त्याची माहिती सर्व्हर येउ लागली. यामुळे सर्व्हर स्लोडाउन होत दुपारी तीन वाजता बंद पडले. यासंदर्भातील तक्रार तातडीने आयोगाकडे करण्यात आली. संध्याकाळपर्यंत सर्व्हर सुरू झालेेले नव्हते.

अनेक शाळा शिक्षकांविनाच
सर्वेक्षणासाठी शिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आल्याने शहरातील अनेक शाळा शिक्षकाविना सुरू होत्या. अनेक शाळांची भिस्त एक किंवा दोन शिक्षकांवरच असल्याचे पाहायला मिळत होते.

केवळ परिसर बघण्यास सांगितले
कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केल्या जाणार्‍या सर्वेक्षणासाठी कर्मचार्‍यांना सकाळी बोलावण्यात आले होते. मात्र, दुपारी तीनपर्यंत त्या कर्मचार्‍यांना परिसर देण्यात आला नाही. त्यामुळे तीन साडेतीन पर्यंत बसूनच राहावे लागले. त्यानंतर साडेतीन वाजता अ‍ॅप सुरू होईल असे सांगण्यात आले मात्र, ते सुरू झाले नाही. त्यामुळे शेवटी त्यांना आज परिसर बघून घ्या आणि उद्या सर्वेक्षण करा, असे सांगण्यात आले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news