पुणे : पुढारी वृत्तसेवा : आपली चळवळ विभाजनाच्या पायरीवर उभी आहे, त्यामुळे आंबेडकरी चळवळ जर जिवंत ठेवायची असेल, तर आपल्यातली एकी वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी चळवळीतल्या लोकांनी इतर जातीच्या, समाजाच्या लोकांनाही आपल्यात सामावून घेतले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने रघुनाथराव राक्षे स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
या व्याख्यानमालेत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची समिश्रा' या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस, तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे उपस्थित होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. लवटे म्हणाले, काउंटी लोकसंख्येत दलितांची टक्केवारी 51 टक्के आहे. तरीही सत्तेत, सरकारमध्ये दलितांचा सहभाग, स्थान नगण्य आहे. त्यामुळे आपण या सर्वांमध्ये कुठे आहोत, आपले अस्तित्व काय आहे, या सर्वांचा खोलवर विचार आपल्याला करावा लागणार आहे.
माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्काराने, तर समाजसेवक डॉ. सुरेश गोरेगावकर यांना तालुकास्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सुरेश गोरेगावकर लिखित 'राजर्षी शाहू समजून घेताना' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रस्तावना मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी, तर सूत्रसंचालन दीपक मस्के यांनी केले.
हेही वाचा