बाणेर : पुढारी वृत्तसेवा : पाषाण-सूस रोड येथील विघ्नहर्ता चौकात दिवसा नवीन बसथांब्याचे शेड चोरण्याचा प्रयत्न करीत असताना काही जणांना नागरिकांनी अडविले. त्यांच्याकडे बसथांब्याचे शेड काढण्यासाठी महापालिकेची परवानगी मागितल्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला. विघ्नहर्ता चौक, सूस रोड येथे गेल्या नोव्हेंबर महिन्यात बसविण्यात आलेले बसथांब्याचे स्टीलचे शेड काढण्यात येत होते. त्याबाबत संबंधितांना माहिती विचारली असता त्यांच्याकडे महापालिकेची कुठलीही परवानगी नव्हती.
तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी असलेला बसथांबा का तोडता, असे विचारले असता त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर उत्तरकर यांनी संबंधित काम थांबविण्यात येऊन या कामगारांवर कारवाई करण्याची मागणी केली. शासकीय पैशांची उधळपट्टी होत असल्याने हा बसथांबा पिंपरी-चिंचवडला घेऊन जायचे आहे, अशी उत्तरे त्यातील काही कामगारांनी दिली. यामुळे ही बसस्टॉपची पळवापळवी आहे की दिवसा होत असलेली चोरी, याची चौकशी करून तो तोडणार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा