पॅरिस : जगभरात अनेक अनोखी बेटं आहेत. कुठे ससेच अधिक आहेत तर कुठे मांजरं. कुठे झाडांवर बाहुल्या टांगून ठेवल्या आहेत तर कुठे सापांचा सुळसुळाट आहे. फ्रान्सच्या ईशान्य भागातही एक अनोखे बेट आहे. हे बेट अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत नांदते होते. लोक तिथे आनंदाने राहत होते. मात्र, आता तिथे कुणालाही जाण्यास बंदी आहे. अगदी प्राण्यांनाही तिथे जाऊ दिले जात नाही!
'झोन रोग' असे या बेटाला म्हटले जाते. गेल्या शंभर वर्षांच्या काळात या परिसराला फ्रान्सच्या अन्य भागांपासून दूरच ठेवले गेले आहे. याठिकाणी जागोजागी 'डेंजर झोन' असे बोर्डही आहेत. त्यावरून इथे येणे धोकादायक आहे याची कल्पना येऊ शकते. पहिल्या महायुद्धाच्या आधी इथे एकूण नऊ गावे होती. या गावातील लोक शेती करून उदरनिर्वाह करीत. मात्र, युद्धाच्या काळात इथे इतका दारूगोळा आणि बॉम्ब टाकण्यात आले की हा परिसर उद्ध्वस्त झाला.
इथे मृतदेहांचा खच पडला होता आणि मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त साहित्य विखरून पडले होते. त्यामुळे येथील जमिनीतच नव्हे तर पाण्यातही विषारी घटक मिसळलेले आहेत. हा संपूर्ण परिसर स्वच्छ करणे शक्य नसल्याने फ्रान्स सरकारने हा परिसर झोन रोग किंवा रेड झोन घोषित केला. 2004 मध्ये वैज्ञानिकांनी 'झोन रोग' मधील माती व पाण्याचे परीक्षण केले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्सेनिक असल्याचे दिसून आले. आर्सेनिक हा एक विषारी पदार्थ असून तो मोठ्या प्रमाणात शरीरात जाणे जीवघेणे ठरते.